Home |  | Audio |  | Index |  | Verses

यहोशवा / Joshua

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24
1 परमेश्वराने इस्राएल लोकांना भोवतालच्या शत्रूंपासून विसावा दिला. त्यांना सुरक्षित केले. अशी अनेक वर्षे लोटली, आता यहोशवा बराच वृध्द झाला होता.
2 तेव्हा एकदा, इस्राएल लोकांमधील वडीलधारी मंडळी, कुटुंबप्रमुख, न्यायाधीश, अंमलदार या सर्वांना यहोशवाने भेटीसाठी एकत्र बोलावले. तो त्यांना म्हणाला, “मी आता म्हातारा झालो.
3 परमेश्वराने आपल्या शत्रूंची काय परिस्थिती करुन टाकली ते तुम्ही पाहीले. आपल्याला मदत करण्याच्या उद्देशाने त्याने ते केले. तुमचा परमेश्वर देव तुमच्यासाठी लढला.
4 यार्देन नदी आणि पश्चिमेला भूमध्य समुद्र यांच्या मधली जमीन तुम्ही काबीज करू शकता हे मी तुम्हाला सांगितल्याचे तुमच्या लक्षात असेलच. ती भूमी तुम्हाला द्यायचे मी वचन दिले आहे, पण अजून तुम्ही ती ताब्यात घेतली नाही.
5 तेथील रहिवाश्यांना तुमचा परमेश्वर देव घालवून देईल. तुम्ही ती आपल्या ताब्यात घ्याल. तेथील. लोकांना परमेश्वर हुसकावून लावील. तुमच्यासाठी त्याने हे करायचे कबूल केले आहे.
6 “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा तुम्ही कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. मोशेच्या नियमशास्त्रान जे जे लिहिले आहे त्या सर्वांचे पालन करा. त्याच्याकडे पाठ फिरवू नका.
7 इस्राएल नसले लीही काही माणसे अजून आपल्यात आहेत. ती त्यांच्या दैवतांची पूजा करतात. अशा लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्या दैवतांची सेवा किंवा पूजा करु नका.
8 आपल्या परमेश्वर देवाचीच उपासना करा. पूर्वी तुम्ही हे केले आहे व पुढेही करत राहा.
9 “परमेश्वराने तुम्हाला तुमच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांचा पराभव करायला मदत केली आहे. त्याने त्या लोकांना बाहेर पडायला भाग पाडले. कोणीही तुम्हाला आतापर्यंत पराभूत करु शकले नाही.
10 परमेश्वराच्या साहाय्याने, एक इस्राएल माणूस शत्रूच्या हजार सैनिकांना सळो की पळो करु शकतो. कारण खुद्द तुमचा परमेश्वर देवच तुमच्या वतीने लढतो. असे करायचा परमेश्राने शब्द दिला आहे.
11 तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वरावरच प्रेम करत राहा.
12 “आपल्या परमेश्वराच्या उपासनेत खंड पडू देऊ नका. इस्राएली, खेरीज इतर लोकांशी मैत्री करु नका. त्यांच्याशी लग्न संबंध ठेवू नका. पण या लोकांशी मैत्री ठेवलीत तर
13 शत्रूला पराभूत करायला तुमचा परमेश्वर देव तुम्हाला मदत करणार नाही. हे लोक तुमच्यासाठी सापळा ठरतील डोव्व्यांत धूर आणि धूळ जाऊन त्रास व्हावा तसा तुम्हाला या लोकांमुळे त्रास होईल. मग तुम्हाला ही चांगली भूमी सोडावी लागेल. परमेश्वराने तुम्हाला ती दिली. पण त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुम्ही देशोधडीला लागाल.
14 “माझी अखेर आता जवळ येऊन ठेपली आहे. परमेश्वराने तुमच्यासाठी बऱ्याच महान गोष्टी केल्या हे तुम्ही जाणता व खरोखरच त्यावर विश्वास ठेवता. त्याने दिलेला शब्द पाळण्यात कुठेही कसूर केली नाही हे तुम्हाला माहीत आहेच. आपल्याला दिलेले प्रत्येक वचन त्याने पुरे केले.
15 परमेश्वर देवाने आपल्याला जी काही चांगली वचने दिली ती सर्व प्रत्यक्षात आली. पण तसेच त्याचे दुसरे वचनही प्रत्यक्षात आल्याखेरीज राहणार नाही. आपण चुकीने वागलो तर आपल्यावर संकटे ओढवतील असाही त्याने शब्द दिला आहे. त्याने दिलेली ही चांगली सुपीक जमीन सोडून आपल्याला जावे लागेल असेही त्याने शपथपूर्वक उच्चारले आहे.
16 तुम्ही तुमच्या परमेश्वर देवाशी केलेल्या कराराचा भंग केलात तर असे घडेल. इतर दैवतांच्या भजनी लागलात तर तुम्ही या जमीनीला मुकाल. तेव्हा त्या इतर दैवतांची चुकूनसुध्दा पूजा करु नका. तसे केलेत तर आपल्या परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल. आणि मग त्याने दिलेल्या या चांगल्या प्रदेशातून तो तुमची हकालपट्टी करेल.”

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]