Home |  | Audio |  | Index |  | Verses

1 इतिहास / 1 Chronicles

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29
1 हिराम सोराचा राजा होता. त्याने दावीदाकडे दूत पाठवले. याखेरीज त्याने गंधसरुचे ओंडके, गवंडी, सुतार हे देखील पाठवून दिले. दावीदासाठी घर बांधायला म्हणून त्याने ही मदत केली.
2 तेव्हा, परमेश्वराने आपल्याला खरोखरच इस्राएलचा राजा केले आहे हे दावीदाच्या लक्षात आले. दावीदावर आणि इस्राएलच्या लोकांवर प्रेम असल्यामुळे देवाने दावीदाचे साम्राज्य विशाल आणि मजबूत केले.
3 यरुशलेम नगरातल्या आणखी काही स्त्रियांशी दावीदाने लग्ने केली. त्याला आणखी मुले - मुली झाली.
4 यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या या मुलांची नावे अशी: शम्मुवा, शोबाब, नाथान, शलमोन,
5 इभार, अलीशवा, एल्पलेट,
6 नोगा, नेफेग. याफीय,
7 अलीशामा, बेल्यादा, अलीफलेट.
8 दावीदाला इस्राएलचा राजा केले आहे हे पलिष्ट्यांना कळले तेव्हा ते दावीदाच्या मागावर निघाले. दावीदाला ही बातमी कळली तेव्हा तो पलिष्ट्यांशी लढायला निघाला.
9 पलिष्ट्यांनी रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर चढाई करुन त्यांना लुटले.
10 दावीद देवाला म्हणाला, “पलिष्ट्यांवर मी प्रतिहल्ला करु काय? मला तू त्यांचा पराभव करु देशील काय?”परमेश्वराने दावीदाला सांगितले, “जरुर जा. मी तुझ्या हातून पलिष्ट्यांचा पराभव करवीन.”
11 मग दावीद आणि त्याची माणसे बाल-परासीम येथपर्यत जाऊन पोचली. त्यांनी पलिष्ट्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “धरणाला खिंडार पाडून पाणी घुसते त्याप्रमाणे देवाने माझ्या शत्रूला मागे सारले आहे. माझ्या कडून देवाने हे करवून घेतले.” म्हणून आता त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम-देवाने पाडलेले खिंडार-असे पडले आहे.
12 पलिष्ट्यांनी आपली दैवाने तिथेच एफाईम दिली. दावीदाने आपल्या माणसांना त्या मूर्ती जाळून टाकायला सांगितल्या.
13 रेफाईमच्या खोऱ्यात राहणाऱ्या लोकांवर पलिष्ट्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला.
14 दावीदाने पुन्हा देवाची प्रार्थना केली. देवाने त्या प्रार्थनेला ओ दिली. तो म्हणाला, “दावीदा, तू पलिष्ट्यांवर हल्ला करायला जाशील तेव्हा समोरुन न जाता पाठीमागून जा. तुतीच्या झाडांमागे लपून बस. त्या झाडांवर चढून बस.
15 तिथे तुला सैन्य चाल करुन जात आहे याची चाहूल लागेल. तेव्हा पलिष्ट्यांवर हल्ला चढव. मी (म्हणजे देव) पलिष्ट्यांवर हल्ला करायला पुढे होईन आणि त्यांचा पराभव करीन.”
16 दावीदाने देवाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाने आपल्या लोकांसह पलिष्ट्यांचा पाडाव केला. गिबोनपासून गेजेपर्यंत त्यांनी पलिष्ट्यांच्या सैन्याला झोडपून काढले.
17 त्यामुळे दावीदाची कीर्ती सर्वदूर पसरली. देवाने सर्व राष्ट्रांत दावीदाची दहशत निर्माण केली.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]