Home |  | Audio |  | Index |  | Verses

उपदेशक / Ecclesiastes

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
1 खूप लोकांना वाईट वागणूक दिली गेल्याचे मी पुन्हा पाहिले. आणि या दु:खी लोकांचे सांत्वन करायला कुणीही नाही. हे ही मी पाहिले. दुष्ट लोकांकडेच सर्व सत्ता असते. हे मी पाहिले. आणि ते ज्या लोकांना दु:ख देतात त्यांचे सांत्वन करायलाही कुणी नसते, हे ही मी पाहिले.
2 जे लोक जिवंत आहेत त्यांच्यापेक्षा मेलेल्या लोकांची अवस्था चांगली आहे असे मला वाटते.
3 आणि जे लोक जन्मत:च मरतात त्यांच्यासाठी तर सर्व खूपच चांगले आहे. का? कारण या जगात जी वाईट कृत्ये केली जातात ती त्यांनी कधी पाहिली नाहीत.
4 नंतर मी विचार केला, “लोक इतके कष्ट का करतात?” लोक यश मिळवायचा प्रयत्न करतात आणि इतरांपेक्षा चांगले होतात. का? कारण लोक मत्सरी असतात. लोकांकडे आपल्यापेक्षा अधिक असावे असे त्यांना वाटत नाही. हे अविचारी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.
5 काही लोक म्हणतात, “हाताची घडी घालून स्वस्थ बसणे हा मूर्खपणा आहे. तुम्ही जर काम केले नाही तर उपाशीपोटी मराल.”
6 कदाचित ते सत्य असेल. पण मी म्हणतो की तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधान मानणे हे अधिकाधिक मिळवण्यासाठी झगडण्यापेक्षा खूप चांगले आहे.
7 ज्या गोष्टीचा अर्थ लागत नाही असे काही तरी मी पुन्हा पाहिले;
8 एखाद्याचे कुटुंब नसेल. त्याला मुलगा किंवा भाऊ नसेल. परंतु तो खूप काबाडकष्ट करत राहील. त्याच्या जवळ जे आहे त्यात त्याला कधीही समाधान वाटणार नाही. आणि तो इतके करतो की तो जरा थांबून स्वत:ला कधीही विचारत नाही, “मी इतके कष्ट का करीत आहे? मी आयुष्याचा उपभोग का घेत नाही?” ही देखील एक अतिशय वाईट आणि अविचारी गोष्ट आहे.
9 एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.
10 जर एखादा माणूस पडला तर दुसरा त्याला मदत करू शकतो. पण जर माणूस एकटा असताना पडला तर ते वाईट असते. त्याला मदत करायला तिथे कुणीही नसते.
11 जर दोन माणसे एकत्र झोपली तर त्यांना ऊब मिळेल. पण जो माणूस एकटाच झोपतो त्याला उबदार वाटणार नाही. त्याला ऊब मिळणार नाही.
12 शत्रू एकाच माणसाचा पराभव करू शकतो. पण त्याला दोघांचा पराभव करता येत नाही. आणि तीन माणसे तर आधिकच भारी असतात. ते तीन भाग वळून केलेल्या दोरीसारखे असतात. ती दोरी तोडणे कठीण असते.
13 गरीब पण शहाणा असलेला तरुण नेता हा वृध्द आणि मूर्ख राजापेक्षा चांगला असतो. तो वृध्द राजा त्याला दिलेल्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही.
14 कदाचित तो तरुण राजा जन्माने गरीब असेल किंवा तो तुंरूगातून राज्य करायला आला असेल.
15 पण मी आयुष्यात लोकांना बघितले आहे आणि मला हे माहीत आहे. लोक त्या तरुणाचेच ऐकतील. तोच नवीन राजा बनेल.
16 खूप लोक त्या तरुणाच्या मागे जातील. पण नंतर त्या लोकांना तो आवडेनासा होईल. हाही अविचारच आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

या Top | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]