Home |  | Audio |  | Index |  | Verses


योएल / Joel

अध्याय : 1 2 3
1 सियोन वरुन रणशिंग फुंका! माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या. ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा भीतीने थरकाप उडू द्या. परमेश्वराचा खास दिवस येत आहे. परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे.
2 तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही.
3 धगधगती आग जसा नाश करते, तसा देशाचा नाश हे सैन्य करील. त्यांच्यासमोरची भूमी एदेनच्या बागेसारखी असेल, पण त्यांच्या मागे निर्जन वाळवंट असेल.त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.
4 ते घोड्यांप्रमाणे दिसतात सैन्यातील घोड्याप्रमाणे ते धावतात.
5 त्यांचा आवाज ऐका. तो आवाज, पर्वतावर चढणाऱ्या रथांच्या खडखडाटाप्रमाणे आहे. फोलकटे जाळणाऱ्या आगीप्रमाणे तो आवाज आहे. ते बलवान आहेत. ते युध्दासाठी सज्ज आहेत.
6 ह्या सैन्यापुढे लोक भीतीने थरथर कापतात आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात.
7 सैनिक जोरात पळतात. ते तटांवर चढतात. प्रत्येक सैनिक सरळ पुढे कूच करतो. ते आपला मार्ग सोडीत नाहीत.
8 ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातो. जरी एकावर वार होऊन तो पडला, तरी दुसरे कूच करीतच राहतात.
9 ते नगरीकडे धाव घेतात. ते त्वरेने तटावर चढतात. ते घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यांतून शिरतात.
10 त्यांच्यापुढे धरणी व आकाश कापते, चंद्र-सूर्य काळे पडतात आणि तारे तळपत नाहीत.
11 परमेश्वर त्याच्या सैन्याला मोठ्याने हाक मारतो. त्याचा तळ फार मोठा आहे. सैन्य त्याच्या आज्ञा पाळते. ते सैन्य खूप बलशाली आहे. परमेश्वराचा खास दिवस हा विलक्षण आणि भयंकर आहे. तो कोण सहन करू शकेल?
12 परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे: “मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्ये केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा.
13 तुमचे कपडे फाडू नका, तर ह्रदये फाडा”परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित् तो बदलेलही.
14 कदाचित परमेश्वराचे मन: परिवर्तन होईलही, कोणी सांगावे! आणि कदीचित तो त्याच्या मागे तुमच्यासाठी आशीर्वादही ठेवून जाईल. मग तुम्ही परमेश्वराला. तुमच्या परमेश्वराला, अन्नार्पणे व पेयार्पणे देऊ शकाल.
15 सियोन वरून रणशिंग फुंका. खास सभा बोलवा. उपवासाची विशिष्ट वेळ ठरवा.
16 लोकाना एकत्र जमवा, खास सभा बोलवा, वृध्दांना एकत्र आणा मुलांना एकत्र जमवा, तान्ह्या मुलांना एकाठिकाणी जमवा. शय्यागृहातून नवरा नवरीलाही येऊ द्या.
17 याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. ह्या सर्व लोकांनी म्हणावे, “परमेश्वरा, तुझ्या माणसांवर दया कर. तुझ्या माणसांची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. तुझी माणसे दुसऱ्या लोकांनी आम्हाला हसू नये वक्ष “कोठे आहे तुमचा परमेश्वर?” असे विचारू नये.
18 मग, देशासाठी, परमेश्वराच्या भावना उत्तेजित झाल्या. त्याला, त्याच्या लोकांबद्दल वाईट वाटले.
19 परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “मी तुमच्याकडे पुन्हा धान्य, द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही तृप्त व्हाल. ह्यापुढे, इतर राष्ट्रांत तुमची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही.
20 मी उत्तरेकडून आलेल्या लोकांना तुमचा देश सोडायला भाग पाडीन. मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात जायला लावीन. त्यातील काही पूर्व समुद्राकडे जातील. तर काही पश्चिम समुद्राकडे जातील. त्या लोकांनी फारच भयंकर कृत्ये केली आहेत. ते मृतांप्रमाणे व सडलेल्या गोष्टींसारखे होतील. तेथे भयंकर दुर्गधी पसरेल.”
21 हे भूमी, घाबरू नकोस. सुखी आणि हर्षाल्लासित हो! कारण परमेश्वर महान गोष्टी घडवून आणणार आहे.
22 रानातल्या प्राण्यानो, घाबरू नका. कारण वाळवंटातील कुरणांत हिरवळ उगवेल, झाडांना फळे लागतील. अंजिराची झाडे व द्राक्षवेली फळांनी लगडतील.
23 म्हणून सियोनवासीयांनो, आनंदित व्हा. तुमच्या परमेश्वर देवामध्ये संतोष माना. तो कृपावंत होऊन, पाऊस देईल. तो पूर्वाप्रमाणेच, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडील.
24 खळी गव्हाने भरून जातील, आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतुनच्या तेलाने भरून वाहतील.
25 “मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले.पण, मी, परमेश्वर, तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.
26 मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
27 मी इस्राएलच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल. मीच परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे, हेही तुम्हाला कळून येईल. माझ्याशिवाय दुसरा कोणताच परमेश्वर नाही. माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.”
28 “ह्यांनंतर मी माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन). तुमची मुले-मुली भविष्य सांगतील तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील.
29 त्या वेळी, मी माझा आत्मा पुरूष व स्त्री सेवकांमध्येसुध्दा ओतीन.
30 मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त, आग व दाट धूर दिसेल.
31 सूर्याऐवजी अंधार होईल. चंद्राचे रूपांतर रक्तात होईल. मग परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवेल.
32 आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील.

या Top | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]