Home |  | Audio |  | Index |  | Verses

मीखा / Micah

अध्याय : 1 2 3 4 5 6 7
1 पाप करण्याचे बेत करणाऱ्यांवर संकट येईल. ते लोक आपल्या शय्येवर दुष्ट बेत करीत पडतात आणि सकाळी फटफटताच, योजलेली वाईट कर्मे करतात. का? कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे म्हणून.
2 त्यांना शेते हवे असतात, म्हणून ते ती घेतात. घरे हवी असतात, म्हणून घरे घेतात. ते एखाद्याला फसवितात. आणि त्याचे घर घेतात. एखाद्याची फसवणूक करुन त्याची जमीन घेतात.
3 म्हणूनच परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो. “पाहा! ह्या कुटुंबाला संकटात टाकण्याचे मी योजीत आहे. तुम्ही स्वत:ला वाचवू शकणार नाही.तुमचे गर्वहरण होईल. का? कारण वाईट वेळ येत आहे.
4 मग लोक तुमच्यावर गाणी रचतील. लोक ही शोकगीते म्हणतील: ‘आमचा विनाश झाला! परमेश्वराने आमची भूमी काढून घेतली आणि ती दुसऱ्यांना दिली. हो खरेच! त्याने माझी जमीन काढून घेतली. परमेश्वराने आमची शेते घेऊन आमच्या शत्रूंमध्ये त्यांची वाटणी केली.
5 म्हणून आता आम्ही जमिनीचे मोजमाप करुन त्या जमिनीची वाटणी परमेश्वराच्या लोकात करु शकत नाही.”
6 लोक म्हणतात, “आम्हाला उपदेश करु नको. आमच्याबद्दल वाईट गोष्टी सांगू नकोस आमचे काहीही वाईट होणार नाही.”
7 पण याकोबच्या लोकांनो, मला ह्या गोष्टी सांगितल्याच पाहिजेत. तुमच्या वाईट कृत्यांमुळे परमेश्वराची सहनशीलता संपुष्टात येत आहे. तुम्ही नीट वागलात, तर मी तुमच्यासाठी चांगली बातमी आणीन.
8 माझ्या लोकांनो, तुम्ही शत्रू म्हणून (परमेश्वराचे अथवा एकमेकाचे) उभे राहिलात. स्वत:ला सुरक्षित समजणाऱ्या, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे तुम्ही कपडे चोरता. पणे ते युध्दकैदी असल्यासारखे मानून तुम्ही त्यांच्या वस्तू काढून घेता.
9 तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांकडून चांगली घरे काढून घेतलीत. त्यांच्या लहान मुलांपासून माझे वैभव काढून घेतले.
10 उठा आणि चालते व्हा! ही तुमची विसाव्याची जागा असणार नाही. का? कारण तुम्ही ही जागा उद्ध्वस्त केलीत. तुम्ही ती अस्वच्छ केलीत. म्हणून तिचा नाश होईल. आणि तो विनाश भयंकर असेल.
11 ह्या लोकांना माझे ऐकावयाचे नाही. पण एखादा खोटे सांगू लागला, तर ते स्वीकारतील. जर खोटा संदेष्टा येऊन म्हणाला, “भविष्यकाळात चांगले दिवस येतील, द्राक्षरस आणि मद्याचा सुकाळ होईल, तर ते त्या खोट्या प्रेषितावर विश्वास ठेवतील.”
12 हो! खरेच! मी याकोबच्या माणसांना एकत्र आणीन. वाचलेल्या इस्राएल लोकांना मी एकत्र करीन. कुरणातील कळपाप्रमाणे वा मेंढवाड्यातील मेंढराप्रमाणे मी त्यांना एकत्र ठेवीन. मग पुष्कळ लोकांच्या गोंगाटाने ही जागा भरुन जाईल.
13 फोडणारा लोकांना ढकलून पुढे जाईल व लोकांच्या पुढे चालेल. तो वेशीचे दार फोडील आणि लोक ते गाव सोडतील. त्या लोकांचा राजा त्यांच्यापुढे चालेल. परमेश्वर सर्व लोकांच्या पुढे असेल.

या Top | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]