1 खरोखरच असे सांगण्यात आले आहे की, तुमच्यामध्ये जारकर्म चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या सावत्र आईशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य विदेशी लोकांमध्येही आढळणार नाही.
2 आणि तरीही तुम्ही गर्वांने फुगला आहात, परंतु तुम्हांला त्याबद्दल शोक व्हायला नको होता का? ज्या कोणी हे कर्म केले असेल त्याला तुमच्यातून काढून टाकले पाहिजे.
3 कारण जरी मी शरीराने तुमच्यात नसलो तरी आत्म्याने हजर आहे. आणि हजर असल्याप्रमाणे त्यांचा मी अगोदरच न्याय केलेला आहे, ज्याने हे अयोग्य कृत्य केले आहे,
4 जेव्हा तुम्ही प्रभु येशूच्या नावात आणि माझ्या आत्म्यात एकत्र जमता व आपल्या प्रभु येशूच्या सामर्थ्यात एकत्र येता, तेव्हा अशा माणसाला त्याच्या देहस्वभावाचा नाश व्हावा म्हणून सैतानाच्या स्वाधीन करावे यासाठी की त्याचा आत्मा प्रभूच्या दिवशी तारला जावा.
5
6 तुमचे बढाई मारणे चांगले नाही. तुम्हांला माहीत नाही का की, ‘थोडेसे खमीर सगळे पीठ फुगविते.ʆ
7 जुने खमीर काढून टाका. यासाठी की, तुम्ही नवीन पीठाचा गोळा व्हावे आणि ख्रिस्ती लोकांसारखे तुम्ही असे आहात: बेखमीर, कारण ख्रिस्त, आपला वल्हांडणाचा कोकरा आम्हांला शुद्ध करण्यासाठी त्याचे अर्पण झाले.
8 यासाठी चला आपण वल्हांडणाचा सण पाळू या. जुन्या खमीराच्या भाकरीने नव्हे तर खरेपणाच्या बेखमीर भाकरीने पाळावा.
9 जे जारकर्मी आहेत त्यांची संगत धरु नये असे मी माझ्या पूर्वीच्या पत्रात लिहिले होते.
10 माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नाही की, तुम्ही या जगातील जे लोक जारकर्मी, लोभी, फसविणारे किंवा मूर्तिपूजक यांची संगत धरु नये असे नाही. त्याबाबतीत तुम्हांलाच हे जग सोडून द्यावे लागेल.
11 परंतु असे आहे की, मी तुम्हांला लिहिले होते, तुम्हांतील जो कोणी स्वत:ला बंधु म्हणतो, परंतु जर तो जारकर्मी, लोभी, मूर्तीपूजक निंदक, मद्यपि, फसविणारा असेल तर त्याची संगत धरु नये. अशा माणसाबरोबर भोजनसुद्धा करु नये.
12 परंतु जे मंडळीबाहेर आहेत त्यांचा निवाडा करणे माझे काम आहे काय? जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय?
13 देव जे मंडळीबाहेर आहेत त्यांचा न्याय करील. पवित्र शास्त्र म्हणते, “तुमच्यामधून दृष्ट मनुष्याला काढून टाका.”