Home |  | Audio |  | Index |  | Verses

2 करिंथकरांस / 2 Corinthians

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
1 देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रषित झालेला पौल याजकडून, तसेच आपला बंधु तीमथ्य याजकडून, देवाची करिंथ येथील मंडळी आणि अखयातील संपूर्ण प्रदेशातील देवाच्या लोकांना
2 देव आपला पिता आणि प्रभु येशू ख्रिस्त याजकडून कृपा व शांति असो.
3 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, करुणायुक्त देवपिता. तो सांत्वन करणारा देव आहे.
4 तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करु शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो त्याच सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करु शकतो.
5 आणि ख्रिस्ताच्या पुष्कळ दु:खामध्ये सहभागी होतो, त्याच प्रकारे ख्रिस्ताद्वारे आम्हांला पुष्कळ सांत्वन मिळते
6 जर आमच्यावर संकटे येतात तर ती संकटे तुमच्या सांत्वनासाठी आणि तारणासाठी आहेत, जर आमच्याकडे सांत्वन आहे तर ते तुमच्या सांत्वनासाठी आहे. यामुळे आम्हाला जे दु:ख आहे तशाच प्रकारचे दु:ख सहन करायला, धीराने सहन करायला मदत होते.
7 आमची तुमच्याविषयीची आशा बळकट आहे. कारण आम्हांला ठाऊक आहे की, जसे तुम्ही दु:खाचे भागीदार आहात तसे सांत्वनाचेही भागीदार आहात.
8 बंधूंनो, आशिया प्रांतात जो त्रास आम्ही सहन केला त्याविषयी तुम्ही अंधारात असावे अशी आमची इच्छा नाही. आम्हांला तेथे मोठे ओझे होते. आमच्या शक्तिपलीकडचे ते ओझे होते. आम्ही जीवनाविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.
9 खरोखर आम्हांला वाटत होते की, आम्ही मरु, पण आम्ही आपल्या स्वत:वर भरंवसा ठेवू नये, यासाठी हे घडले. हे यासाठी घडले की, जो मनुष्यांना मरणातून उठवितो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा.
10 देवाने आम्हांला मरणाच्या मोठ्या संकटातून वाचविले. आणि देव आम्हांला पुढेदेखील वाचवील. आम्ही त्याच्यावर आमची आशा ठेवली आहे. यासाठी की, तो यापुढे ही आम्हांस सोडवील.
11 तुम्ही प्रार्थना करण्याने आम्हांला मदत करावी. मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनांमुळे देवाने आम्हाला आशीर्वादित केले आहे.
12 कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामणिकपणे जगात व विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो.
13 कारण ज्या गोष्टी तुम्ही वाचता किंवा मान्य करता, त्याशिवाय दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हांस लिहित नाही. आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट जाणून घ्याल अशी आशा धरतो.
14 आणि त्याप्रमाणे तुम्ही आम्हांस काही अंशी जाणता की प्रभु येशूच्या दिवशी जसे आम्ही तुमच्याविषयी अभिमान बाळगतो तसे तुम्हीही आमच्याविषयी अभिमान बाळगता.
15 मला याविषयीची खात्री असल्याने तुम्हांला पहिल्याने भेटण्याची योजना केली, यासाठी की तुम्हांला फायदा व्हावा.
16 मी मासेदोनियाला जाताना तुम्हांला भेटण्याची योजना केली आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरविले आणि त्यानंतर तुम्ही मला यहूदीयाला जाण्यासाठी मदत करावी.
17 जेव्हा मी असा बेत केला, तेव्हा तो मी गंभीरपणे विचार न करता केला काय? किंवा मी माझ्या योजना जगाच्या रीतीप्रमाणे करतो काय, म्हणजे मी एकाच वेळेला “होय, होय” आणि “नाही, नाही” असे म्हणतो काय?
18 पण देव खात्रीने विश्वासपात्र आहे, म्हणून तुम्हांजवळ आम्ही तुम्हांला होय किंवा नाही म्हणून असे वचन दिलेले नाही, असे नाही.
19 कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त जो आम्हांकडून, म्हणजे मी, सिल्वान व तीमथ्य यांजकडून तुम्हांमध्ये गाजविला गेला, तो होय किंवा नाही असा झाला नाही, तर तो फक्त होकारार्थीच आहे.
20 कारण देवाची वचने कितीही असली तरी ती त्याच्यामध्ये होकारार्थी आहेत, यामुळे त्याच्याद्वारे आम्हांकडून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे विशेष आशीर्वाद आहे (आमेन).
21 आता जो तुम्हांसहित आम्हांस ख्रिस्तामध्ये स्थिर करतो व ज्याने आम्हांस अभिषेक केला तो देव आहे.
22 मालकीपणाचा शिक्का आमच्यावर मारला व जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आपला आत्मा आमच्या अंतरंगात ठेव म्हणून ठेवला.
23 मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मारुन आपल्या जिवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करु नये म्हणून मी करिंथला आलो नाही.
24 आम्ही तुमच्या विश्वासावर स्वामित्व करतो असे नाही, पण तुमच्या आनंदासाठी आम्ही तुमच्याबरोबर काम करतो. कारण विश्वासाने तुम्ही स्थिर राहता.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]