1 राजा हिज्कीयाने सर्व हकीकत ऐकली. दु:ख आणि उद्वेग यांच्या भरात त्याने अंगावरची वस्त्रे फाडली आणि जाडेभरडे कपडे घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
2 कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना आणि वडीलधारे याजक यांना हिज्कीयाने आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले. त्यांनीही दु:ख प्रदर्शित करणारे जाडेभरडे कपडे घातले होते.
3 ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण आईला प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे.
4 त्या सेनापतीचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्याला आपल्या जिवंत देवाची निंदा करायला पाठवले होते. कदाचित् हे सर्व आपल्या परमेश्वर देवाच्या कानावर जाईल. शत्रूचा अंदाज चुकीचा आहे हे तो दाखवूनही देईल. तेव्हा अजून जे लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना कर.”‘
5 राजा हिज्कीयाचे अधिकारी यशयाकडे गेले.
6 यशया त्यांना म्हणाला, “हिज्कीयाला हा निरोप द्या. ‘परमेश्वर म्हणतो माझ्या टवाळीचे जे उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका.
7 मी आता त्याच्यात एका आत्म्याचा संचार करतो. एक अफवा तो ऐकेल आणि त्यामुळे तो स्वदेशी पळून जाईल आणि आपल्या देशातच त्याला तलवारीने मरण येईल असे मी करतो.”‘
8 अश्शूराचा राजा लाखीश सोडून गेल्याचे सेनापतीने ऐकले. यहूदातील एक नगर लिब्ना याच्याविरुध्द तो लढत असल्याचे त्या सेनापतीला आढळले.
9 कूशाचा राजा तिऱ्हाका आपल्याशी लढायला येत आहे अशी अफवा अश्शूरच्या राजाने ऐकली. तेव्हा अश्शूरच्या राजाने हिज्कीयाकडे पुन्हा निरोप घेऊन दूत पाठवले. निरोप असा होता.
10 यहूदाचा राजा हिज्कीयाला सांगा “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात त्याच्याकडून फसगत करुन घेऊ नका. तो म्हणतो, ‘अश्शूरचा राजा यरुशलेमचा पराभव करणार नाही.’
11 अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही.
12 त्या राष्ट्रांच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.
13 हमाथ, अर्पाद, सफरवाईम, हेना आणि इळा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुळा उडाला आहे.”
14 हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले.
15 परमेश्वराची प्रार्थना करुन हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,
16 परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा.
17 खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. 17खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत.
18 तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. माणसाने केलेल्या त्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या.
19 तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राज्यांना कळेल.”
20 आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो, ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हणे मी ऐकले आहे.’
21 “सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरुशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरुशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.
22 पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला क:पदार्थ लेखलेस? तू हे कोणाविरुध्द बोललास? इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास.
23 परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे.
24 मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नढ्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला.”
25 तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय?’ “पूर्वी, फार फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.
26 तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती.
27 तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहीत आहे.
28 माझ्या विरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.”
29 “मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.
30 यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल.
31 कारण काही जण बचावतील. ते यरुशलेममधून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल.
32 “अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो,तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही.
33 तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
34 या नगराचे रक्षण करुन त्याला मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.”
35 त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.
36 तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला.
37 एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्याला तलवारीने मारले. मग ते अराराटया देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसर-हद्दोन राज्य करु लागला.