1 एकदा संदेष्ट्याची मुले अलीशाला म्हणाली, “आम्ही राहतो ती जागा आम्हाला अपुरी पडते.
2 यार्देन नदीवर जाऊन आम्ही लाकूड तोडून आणतो. एकेकजण एकेक ओंडका आणू आणि आमच्यासाठी तिथे राहायला घर बांधू.”अलीशा म्हणाला, “छान, जा आणि कामाला लागा.”
3 एकजण म्हणाला, “आमच्याबरोबर चला.”अलीशा म्हणाला, “ठीक आहे, येतो.”
4 तेव्हा अलीशा त्या संदेष्ट्यांच्या मुलांबरोबर गेला. ते यार्देन नदी जवळ आले आणि झाडे तोडायला लागले.
5 झाड पाडत असताना एकाचे लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ही कुऱ्हाड उसनी मागून आणली होती.”
6 अलीशाने विचारले, “ती पडली कुठे?”तेव्हा त्याने, लोखंडी कुऱ्हाडीचे पाते पडले ती जागा दाखवली. अलीशाने मग एक काठी घेतली आणि ती त्या जागी पाण्यात टाकली. त्याबरोबर ते पाते काठीबरोबर तरंगत वर आले.
7 अलीशा म्हणाले, “घे ते पाते उचलून.” मग त्या माणसाने पुढे होऊन पाते उचलले.
8 अरामच्या राजाची इस्राएलशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली. राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी दबा धरुन बसा आणि इस्राएली लोक येतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा.”
9 पण संदेष्टा अलीशा याने इस्राएलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा. त्या ठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य लपून बसले आहे.
10 ज्या जागेबद्दल अलीशाने सावधगिरीचा इषारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्राएलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले.”
11 या गोष्टीचा अरामच्या राजाला धक्का बसला. त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.”
12 तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, आमच्यापैकी कोणीही हेर नाही. इस्राएलचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला अनेक गुपिते सांगतो. अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील!”
13 तेव्हा अरामचा राजा म्हणाला, “कुठे आहे तो अलीशा. त्याला पकडायला मी माणसे पाठवतो!”तेव्हा अरामच्या राजाच्या सेवकांनी त्याला, अलीशा दोथानमध्ये असल्याचे सांगितले.
14 मग अरामच्या राजाने घोडे, रथ आणि बरेचसे सैन्य दोथान कडे रवाना केले. ते रात्री तेथे पोचले आणि त्यांनी नगराला वेढा घातला.
15 अलीशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथघोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले.अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करायचे?”
16 अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!”
17 आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वर, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.”परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्रीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.
18 हे अग्नीरथ आणि अग्रीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करुन म्हटले, “तू या लोकांना आंधळे करुन टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.”अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले.
19 अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले.
20 ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.”परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनमध्ये असल्याचे कळले.
21 इस्राएलच्या राजाने हे अरामी सैन्य पाहिले. राजा अलीशाला म्हणाला, “बाबा, मी यांना मारु का? त्यांना ठार करु का?”
22 अलीशा म्हणाला, “नाही, यांना मारु नको. लढाईत ज्यांना पकडून आणले त्यांना तलवारीने किंवा धनुष्यबाणाने मारायचे नसते. या अरामी सैन्याला खायला प्यायला दे. थोडी भाकर आणि पाणी दे मग त्यांना आपल्या धन्याकडे परत जाऊ दे.
23 इस्राएलच्या राजाने या सैन्याच्या जेवणाची व्यवस्था केली. मग त्या अरामी सैन्याचे खाणे पिणे झाल्यावर राजाने त्यांना परत पाठवले. ते सैन्य आपल्या राजाकडे परत आले. मग पुन्हा अरामी सैन्याची धाड इस्राएलवर आली नाही.”
24 या नंतर, अरामचा राजा बेन-हदाद याने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव केली आणि शोमरोन नगराला वेढा दिला.
25 या सैन्याने नगरात अन्न धान्य जाऊ देण्यास बंदी घातली. त्यामुळे शोमरोनमध्ये लोकांची अन्नान्न दशा झाली. गाढवाचे मुंडके ऐंशी रौप्यमुद्रांना आणि कबुतराची विष्ठा पाच रौप्यमुद्रांना विकली जाऊ लागली इतकी लोकांवर वाईट वेळ आली.
26 असे चाललेले असताना इस्राएलचा राजा एकदा शहराच्या तटबंदीवरुन चालला होता. तेव्हा एका बाईने त्याला मोठ्याने हाक मारली आणि सांगितले, “माझे स्वामी व प्रभू कृपाकरुन मला मदत करा!”
27 इस्राएलचा राजा तिला म्हणाला, “जर परमेश्वर तुला मदत करत नाही तरी मी कशी तुला मदत करु? माझ्या जवळ तुला देण्यासारखे काहीच नाही ना खळ्यांतले धान्य, ना द्राक्षकुंडातील द्राक्षारस.”
28 मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग द्या आपण माझा मुलगा खाऊ.’
29 तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्याला आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”
30 बाईचे हे बोलणे ऐकून राजा इतका व्यथित झाला की दु:खाच्या भरात त्याने आपले कपडे फाडले. तो तिथून पुढे गेला तेव्हा त्याने आतून जाडेभरडे कपडे घातलेले लोकांनी पाहिले. तेव्हा तो दु:खी आणि उदास आहे हे लोकांच्या लक्षात आले.
31 राजा म्हणाला, “आज दिवस मावळे पर्यंत शाफाटचा मुलगा अलीशा याचे मस्तक त्याच्या धडावर राहिले तर परमेश्वर मला हवे ते शासन करो!”
32 राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडीलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांना म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा दार लावून घ्या. त्याला अजिबात आत येऊ देऊ नका. त्याच्या मागेमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहूल मला लागली आहे!”
33 अलीशा हे बोलत असातानाच दूत त्याच्या जवळ आला. त्याने निरोप दिला “हे संकट परमेश्वराकडूनच आले आहे. आता मी त्याची आणखी वाट कशासाठी पाहू?”