Home |  | Audio |  | Index |  | Verses

यिर्मया / Jeremiah

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52
1 परमेश्वर म्हणतो, “मी जोरदार वादळ निर्माण करीन. त्या वादळाचा तडाखा बाबेलला व तिच्या लोकांना देईन.
2 मी बाबेलची उफाणणी करण्यासाठी परदेशी लोक पाठवीन. ते बाबेलला पाखडून काढतील. ते बाबेलमधून सर्व काही नेतील सैन्य बाबेलला वेढा देईल. बाबेलमध्ये भयंकर संहार होईल.
3 बाबेलच्या सैन्याला त्यांच्या धनुष्यबाणांचा उपयोग करता येणार नाही. त्यांना चिलखते चढवायलाही वेळ मिळणार नाही. बाबेलच्या तरुण पिढीबद्दल खेद करु नका. बाबेलच्या सैन्याचा नाश करा.
4 बाबेलचे सैनिक खास्द्यांच्या भूमीत गारद केले जातील. बाबेलच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जखमी केले जातील.”
5 सर्वशक्तिमान परमेश्वराने इस्राएलला व यहूदास, विधवेप्रमाणे टाकून दिलेले नाही. देवाने त्या लोकांचा त्याग केलेला नाही. उलटपक्षी, त्याच लोकांनी इस्राएलच्या एकमेव पवित्र परमेश्वराला सोडण्याचा गुन्हा केला आहे. लोकांनी परमेश्वराला सोडले. पण देवाने काही त्या लोकांना दूर लोटले नाही.
6 स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बाबेलमधून दूर पळून जा. बाबेलच्या पापांबद्दल, मागे राहून, स्वत:वर मरण ओढवून घेऊ नका. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना परमेश्वराने सजा देण्याची वेळ आता आली आहे. बाबेलला योग्य अशीच सजा मिळेल.
7 बाबेल म्हणजे जणू काही परमेश्वराच्या हातातील सोन्याचा प्याला होता. बाबेलने सर्व जगाला मद्य पाजले. राष्ट्रांनी बाबेलचे मद्य प्यायले आणि ते खुळे झाले.
8 पण बाबेलचे अकस्मात पतन होईल आणि त्याची शकले पडतील. तिच्यासाठी शोक करा. तिच्या दु:खावर इलाज करा. कदाचित् तिच्या जखमा भरुन येतील.
9 आम्ही बाबेलला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण ती पूर्वपदावर येणे शक्य नाही, तेव्हा आपण तिला सोडून आपापल्या देशात जाऊ या. स्वर्गातील देव बाबेलच्या शिक्षेबद्दल आणि भवितव्याबद्दल निर्णय घेईल.
10 परमेश्वराने आपल्याला न्याय दिला. आपण त्याबद्दल सियोनमध्ये सांगू या. आपल्या परमेश्वर देवाने घडवून आणलेल्या गोष्टींबद्दल आपण बोलू या.
11 बाण धारदार करा! ढाली घ्या. परमेश्वराला मेद्यांच्या राजाकडून बाबेल नष्ट करायचे होते, म्हणून त्याने त्यांना स्फूर्ती दिली. बाबेलच्या लोकांना योग्य अशी शिक्षा परमेश्वर करील. बाबेलच्या सैन्याने यरुशलेममधील परमेश्वराचे मंदिर उध्वस्त केले. त्याबद्दल परमेश्वर त्यांना यथायोग्य शिक्षा करील.
12 बाबेलच्या तटासमोर झेंडा उभारा. जास्ती रक्षक आणा. पहारेकऱ्यांना त्यांच्या जागी उभे करा. छुपा हल्ला करण्याची तयारी करा. परमेश्वर, त्याने ठरविल्याप्रमाणे करील. बाबेलच्या लोकांविरुद्ध, त्याने सांगितल्याप्रमाणे, तो कारवाई करील.
13 बाबेल, तू भरपूर पाण्याच्या ठिकाणी वसली आहेस. तुझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. पण राष्ट्र म्हणून तुझा शेवट जवळ आला आहे. तुझा नाश करण्याची हीच वेळ आहे.
14 सर्वशक्तिमान परमेश्वराने स्वत:च्या नावाने पुढील वचन दिले, “बाबेल, मी तुझ्यात मोठ्या प्रमाणात शत्रू सैन्य पेरीन. एखाद्या टोळ धाडीप्रमाणे असणारे हे सैन्य तुझ्याविरुध्दची लढाई जिंकले. आणि तुझ्या भूमीवर उभे राहून ते जयघोष करील.”
15 परमेश्वराने आपली महान शक्ती वापरुन ही पृथ्वी निर्माण केली. त्याने आपले ज्ञान वापरुन जगाची उभारणी केली. आपल्या आकलन शक्तीने त्यावर आकाश पांघरले.
16 जेव्हा परमेश्वर गरजतो, तेव्हा आकाशात ढगांचा गडगडाट होतो तो पृथ्वीवर सर्वत्र ढग पाठवितो पावसाबरोबर वीज पाठवित तो आपल्या कोठारातून वारा आणतो.
17 पण लोक इतके मूर्ख असतात की देवाने काय केले ते जाणत नाहीत. कुशाल कारागीर खोट्या दैवतांच्या मूर्ती करतात. त्या मूर्ती खोट्याच असतात. त्या म्हणजे कारगिराच्या मूर्खपणाचे प्रतीक होय. त्या मूर्ती काही जिवंत नसतात.
18 त्या मूर्ती कवडीमोलाच्या आहेत. लोकांनी घडविलेल्या त्या मूर्ती म्हणजे भ्रम आहे. त्यांच्या न्यायनिवाड्याचा दिवस उजाडेल आणि त्यांचा नाश केला जाईल.
19 पण याकोबाचा अंश (देव) त्या टाकाऊ पुतळ्यांसारखा नाही. लोकांनी देवाला निर्माण केले नसून, देवाने त्या लोकांना निर्माण केले. प्रत्येक गोष्टीचा निर्माता तोच एकमेव आहे. त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
20 परमेश्वर म्हणतो, “बाबेल, तू माझा दंडुका आहेस. तुझा उपयोग मी राष्ट्रांची शकले व राज्यांचा नाश करण्यासाठी केला.
21 तुझा उपयोग मी घोडे आणि स्वार, रथ आणि सारथी ह्यांचा नाश करण्यासाठी केला.
22 पुरुष आणि स्त्रिया वृद्ध आणि तरुण, तरुणी यांचा नाश करण्यासाठी मी तुझा उपयोग केला.
23 मेंढपाळ व कळप, शेतकरी आणि गाई, राज्यकर्ते व महत्वाचे अधिकारी यांचा नाश करण्यासाठी मी तुझा उपयोग केला.
24 पण मी बाबेलचे व तेथील लोकांचे उट्ठे काढीन. त्यांनी सियोनमध्ये जी दुष्कृत्ये केली, त्याचे परिणाम मी त्यांना भोगायला लावीन. यहूदा, तुझ्या लक्षात येईल, असे शासन मी त्यांना करीन.” असे परमेश्वर म्हणाला,
25 परमेश्वर म्हणतो, “बाबेल तू एखाद्या विनाशकारी पर्वताप्रमाणे आहेस, आणि मी तुझ्याविरुद्ध आहे. तू सर्व देशाचा नाश केलास, आणि मला ते आवडले नाही. मी माझ्या हाताच्या बळाने तुला कड्यांवरुन लोटून देईन. आणि बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुझी स्थिती करीन.
26 इमारतींच्या पायासाठी लोक बाबेलमधून एकही दगड घेणार नाहीत. कोनाशिलेला लागणारा मोठा चिरा लोकांना मिळणार नाही. का? कारण तुमची नगरी म्हणजे पडीक दगडधोंड्यांचा कायमचा खच असेल.” परमेश्वराने हे सांगितले.
27 “देशात युद्धाचे निशाण उभारा! सर्व राष्ट्रांमध्ये कर्णा फुंका. बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांना सज्ज करा. अरारात, मिन्नी, आष्कनाज या राज्यांना बाबेलवर चढाई करण्यासाठी बोलवा. तिच्याविरुद्ध लढणाऱ्या सैन्याच्या सेनापतीची निवड करा. टोळधाडीप्रमाणे घोडे पाठवा.
28 बाबेलविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रांची सिद्धता करा. मेद्यांच्या राजांना सज्ज करा. त्यांच्या अधिपतींना आणि अधिकाऱ्यांना लढण्यासाठी तयार करा. बाबेलच्या अंमलाखालच्या सर्व देशांना बाबेलच्या विरुद्ध लढण्यास सिद्ध करा.
29 वेदना होत असल्याप्रमाणे भूमी कापते व हालते. बाबेलबद्दल परमेश्वराने ठरविलेला बेत परमेश्वराने सिद्धीस नेताच भूमी कंप पावेल. बाबेलचे निर्जन वाळवंटात रुपांतर करण्याचा देवाचा बेत आहे. तेथे कोणीही राहणार नाही.
30 बाबेलच्या सैनिकांनी लढाई थांबवली आहे. ते त्यांच्या किल्ल्यांतच राहिले आहेत. त्यांची शक्ती संपली आहे ते बायकांप्रमाणे घाबरुन गेले आहेत. बाबेलमधील घरे जळत आहेत. तिच्या वेशीच्या दारांचे अडसर मोडले आहेत.
31 एका दूतामागून दुसरा दूत येतो. दूतामागून दूत येतात. ते बाबेलच्या राजाला संपूर्ण शहर काबीज केले गेल्याचे सांगतात.
32 नदीचे उतार शत्रूच्या ताब्यात गेले आहेत. पाणथळ प्रदेश जळत आहेत. बाबेलचे सर्व सैनिक घाबरले आहेत.”
33 सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो, “बाबेल म्हणजे जणू काही खळे आहे. सुगीच्या वेळी लोक फोलकटापासून दाणे वेगळे करण्यासाठी धान्य झोडपतात आणि बाबेलला झोडपण्याची वेळ लवकरच येत आहे.”
34 सियोनचे लोक म्हणतील, “बाबेलच्या राजा नबुखद्नेस्सरने पूर्वी आमचा नाश केला. पूर्वी त्याने आम्हाला दुखावले. त्याने आमचे लोक नेले, व त्यामुळे आमची स्थिती रिकाम्या रांजणासारखी झाली. आमच्याजवळचे जेवढे चांगले, तेवढे त्याने नेले, आणि आम्हाला दूर फेकून दिले. तो पोट भरेपर्यंत आम्हाला खाणाऱ्या एखाद्या प्रचंड राक्षसासारखा होता.
35 आम्हाला दुखविण्यासाठी बाबेलने भंयकर गोष्टी केल्या. आता त्याची परतफेड करण्याची आमची इच्छा आहे.” सियोन मध्ये राहणारे लोक असे म्हणाले.“आमच्या लोकांना मारण्याचा अपराध बाबेलच्या लोकांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना आता सजा मिळत आहे.” यरुशलेम नगरी अशी म्हणाली.
36 म्हणून परमेश्वर म्हणतो, “यहूदा, मी तुझे रक्षण करीन. बाबेलला शिक्षा होईल ह्याची मी दक्षता घेईन. मी बाबेलचा समुद्र आटवीन आणि तिचे जलस्रोत सुकवून टाकीन.
37 बाबेल म्हणजे पडक्या इमारतींची रास होईल. जंगली कुत्रेच तेथे राहतील. लोक ती दगडधोंड्यांची रास पाहून चकित होतील. बाबेलचा विचार त्यांच्या मनात येताच ते हळहळतील. बाबेल अगदी निर्जन होईल.
38 “बाबेलचे लोक गुरगुरणाऱ्या सिंहाच्या छाव्यासारखे आहेत. ते छाव्याप्रमाणे गुरगुरतात.
39 ते शक्तिवान सिंहासारखे वागत आहेत. मी त्यांना मेजवानी देईन. मी त्यांना मद्य प्यायला लावीन. ते हसतील व मजा करतील. मग मात्र ते कायमचे झोपी जातील. ते पुन्हा कधीच उठणार नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
40 “बाबेल, मरणाची वाट पाहणाऱ्या शेळ्या, मेंढ्या, एडके ह्यांच्याप्रमाणे, असेल. मी त्यांना त्यांची कत्तल करण्यासाठी घेऊन जाईन.
41 “शेशखचा” पराभव होईल. सर्व जगातील अत्युत्तम व गर्विष्ठ देशाला कैदी बनवले जाईल. दुसऱ्या राष्ट्रांतील लोक बाबेलकडे पाहून भयभीत होतील. कारण बाबेलला उध्वस्त होताना त्यांनी पाहिले होते.
42 समुद्र बाबेलवर पसरेल. त्याच्या गरजणाऱ्या लाटा बाबेलला झाकून टाकतील.
43 बाबेलमधील गावांचा नाश होईल आणि ती ओसाड बनतील. बाबेल एक रुक्ष वाळवंट होईल. तो निर्जन होईल. लोक ह्या भूमीतून नुसता प्रवाससुध्दा करणार नाहीत.
44 बाबलेमधील बेल या दैवताला मी शिक्षा करीन. मी, त्यांने गिळलेल्यांना, त्याला ओकायला लावीन. बाबेलची तटबंदी पडेल, आणि इतर राष्ट्रे बाबेलकडे येणार नाहीत.
45 माझ्या लोकांनो, बाबेलच्या शहरातून बाहेर या. जीव वाचविण्यासाठी पळा. परमेश्वराच्या कोपापासून दूर पळा.
46 “माझ्या माणसांनो, भिऊ नका. अफवा पसरतील, पण घाबरु नका. एक अफवा ह्या वर्षी तर दुसरी पुढल्या वर्षी येईल. देशातील भयानक युध्दाबद्दल अफवा पसरतील. राजांच्या एकमेकांविरुद्ध चाललेच्या लढाईबद्दल वावड्या उठतील.
47 बाबेलच्या दैवतांना शिक्षा करण्याची व संपूर्ण बाबेल देशाला लज्जित होण्याची, वेळ नक्कीच येईल. त्या शहराच्या रस्त्यांवर खूप प्रेते पडलेली असतील.
48 मग आकाश व पृथ्वी जयघोष करील. कारण उत्तरेकडून बाबेलविरुद्ध लढण्यासाठी सैन्य येईल.” परमेश्वरच असे म्हणाला,
49 “बाबेलने इस्राएलच्या लोकांना ठार केले. पृथ्वीवरच्या प्रत्येक प्रदेशातील लोकांना बाबेल देशाने ठार मारले. म्हणून बाबेलचे पतन झालेच पाहिजे.
50 तुम्ही लोकांनी तलवारीला चुकविले. तुम्ही घाई करुन बाबेल सोडला पाहिजे. वाट पाहू नका.तुम्ही दूरदेशी आहात. पण तुम्ही जेथे आहात, तेथून परमेश्वराचे स्मरण करा, आणि यरुशलेमची आठवण ठेवा.
51 “आम्ही, यहूदाचे लोक लज्जित झालो आहोत. आमचा अपमान झाला आहे. का? कारण परके परमेश्वराच्या मंदिरातील पवित्र ठिकाणी गेले आहेत.”
52 परमेश्वर म्हणतो, “बाबेलमधील मूर्तींना शिक्षा करण्याची वेळ येत आहे. त्या वेळी, देशात सर्व ठिकाणी जखमी लोक यातनेने तळमळतील.
53 कदाचित् बाबेल आकाशाला टेकेपर्यंत वाढली असती. बाबेलने आपले किल्ले मजबूत केले असते. पण मी तिच्याविरुद्ध लढण्यास माणसे पाठवीन, आणि ते तिचा नाश करतील.” परमेश्वर असे म्हणाला,
54 “बाबेलमध्ये लोक रडताना आपण ऐकू शकतो. लोक तेथील वस्तूंचा नाश करीत असल्याचे आपण ऐकतो.
55 लवकरच परमेश्वर बाबेलचा नाश करील. त्या शहरातील कोलाहल तो शांत करील. लाटांच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करीत शत्रू येतील. आजूबाजूचे लोक त्या गर्जना ऐकतील.
56 सैन्य येईल व बाबेलचा नाश करील. बाबेलचे सैनिक पकडले जातील. त्यांची धनुष्ये मोडली जातील. का? कारण लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल परमेश्वर त्यांना शिक्षा करतो. त्यांच्या पात्रतेनुसार परमेश्वर त्यांना पूर्ण शिक्षा करतो.
57 बाबेलमधील ज्ञानी, महत्वाचे अधिकारी, राज्यपाल, इतर अधिकारी आणि सैनिक यांना मी मद्य पाजून झिंगायला भाग पाडीन. मग ते कायमचे झोपी जातील. परत कधीही उठणार नाहीत.” राजा असे म्हणाला. त्या राजाचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर.
58 सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “बाबेलची जाड मजबूत तटबंदी जमीनदोस्त केली जाईल. तिची उंच प्रवेशद्वारे जाळली जातील. बाबेलचे लोक खूप मेहनत करतील. पण त्याचा काही उपयोग होणार नाही. शहर वाचविण्याच्या प्रयत्नात ते पार दमून जातील. ते सरपणाप्रमाणे होतील.”
59 सारया ह्या अधिकाऱ्याला यिर्मयाने पुढील संदेश दिला. सारया नेरीयाचा मुलगा होय व नेरीया हा मासेयाचा मुलगा होय. यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर सारया, सिद्कीयाच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलला गेला. त्याच वेळी, सारयाला यिर्मयाने संदेश दिला.
60 यिर्मयाने बाबेलमध्ये घडून येणाऱ्या सर्व भयानक गोष्टी एका पटावर लिहिल्या होत्या.
61 यिर्मया सारयाला म्हणाला, “सारया, बाबेलला जा. सर्व लोक हा संदेश ऐकतील अशी खात्री करुन घेऊन तो वाच.
62 मग म्हण, ‘हे देवा, बाबेलचा नाश करीन असे तू म्हणालास, तू तिचा नाश करशील. मग तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू राहणार नाही. ती जागा सदाकरिता ओसाड भग्नावशेष होईल.’
63 हा संदेश वाचून संपताच पटाला एक दगड बांध. नंतर हा पट फरात नदीत फेकून दे.
64 मग असे म्हण ‘बाबेल बुडेल पुन्हा ती कधीही वर येणार नाही. कारण मी तिच्यावर भयंकर संकटे आणीन.’ आणि बाबेलचे लोक थकून जातील.”येथे यिर्मयाचे बोलणे संपले.

या Top | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]