1 बन्यामीनच्या लोकांनो, जीव वाचविण्यासाठी पळा. यरुशलेमपासून दूर पळा. तकोवामध्ये तुतारी फुंका. बेथ-हक्करेमवर धोक्याचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे. भयानक नाश तुमच्याकडे येत आहे.
2 सियोनच्या कन्ये, तू सुंदर कुरणासारखी आहेस.
3 मेंढपाळ आपापले कळप घेऊन यरुशलेमला येतात. ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतात. प्रत्येक मेंढपाळ स्वत:च्या कळपाची काळजी घेतो.
4 “यरुशलेमविरुद्ध लढण्यास तयार व्हा. उठा! आपण दुपारी नगरावर हल्ला करु पण आधीच उशीर होत आहे. संध्याछाया लांबत आहेत.
5 म्हणून उठा! आपण रात्रीच तिच्यावर हल्लाकरु या व यरुशलेमच्या भक्कम तटबंदीचा नाश करु या.”
6 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, “यरुशलेमच्या भोवतालची झाडे कापा आणि तिच्याविरुद्ध मोर्चा बांधा. ह्या नगरीला शिक्षा व्हावीच ह्या नगरीच्या आत जुलुमाशिवाय काहीही नाही.
7 जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच यरुशलेम आपला दुष्टपणा ताजा ठेवते. मी नेहमीच येथील लूटमार व हिंसाचार याबद्दल ऐकतो. मी येथे सदोदित पीडा आणी घृणा पाहतो.
8 यरुशलेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन, तुझ्या भूमीचे ओसाड वाळवंट करीन. येथे कोणीही राहू शकणार नाही.”
9 सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो “इस्राएलमध्ये मागे उरलेल्या इस्राएली लोकांना गोळा करा. द्राक्षवेलींवरची उरलेली द्राक्षे तुम्ही जशी गोळा करता, तसे त्यांना गोळा करा.” द्राक्ष गोळा करणारा जसा प्रत्येक वेल तपासतो, तशी तुम्ही प्रत्येकाची तपासणी करा.”
10 मी कोणाशी बोलू शकतो? मी कोणाला इशारा देऊ शकतो? माझे कोण ऐकेल? इस्राएलच्या लोकांनी आपले कान बंद करुन घेतले आहेत. म्हणून ते माझा इशारा ऐकू शकत नाहीत. लोकांना परमेश्वराची शिकवण आवडत नाही. त्यांना परमेश्वराचा संदेश ऐकावासा वाटत नाही.
11 पण माझ्यात (यिर्मयात) परमेश्वराचा राग पूर्ण भरला आहे. “तो आतल्या आत दाबून धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांवर, एकत्र जमलेल्या तरुणांवर परमेश्वराचा राग ओत. पुरुष व त्याची बायको असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील.
12 त्यांची घरे दुसऱ्यांना दिली जातील. त्यांची शेते व त्यांच्या बायका दुसऱ्यांना दिल्या जातील. मी माझा हात उगारीन आणि यहूदातील लोकांना शिक्षा करीन.” हा परमेश्वराचा संदेश होता.
13 “इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे. अति महत्वाचे व अति सामान्य, सर्व सारखेच आहेत. संदेष्ट्यांपासून याजकापर्यंत सर्व खोटे बोलतात.
14 माझे लोक अतिशय वाईटरीतीने दुखवले जात आले आहेत. संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात. पण ते तर त्या जखमावर, किरकोळ खरचटल्यावर करतात त्याप्रमाणे इलाज करतात. ते म्हणतात, ‘ठीक आहे, ठीक आहे ‘पण हे ठीक नाही.
15 संदेष्ट्यांना आणि याजकांना त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल लाज वाटली पाहिजे. पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. आपल्या दुष्कृत्यांची शरम वाटण्याएवढीही त्यांना जाणीव नाही. म्हणून बाकीच्याबरोबर त्यांना शिक्षा होईल. मी जेव्हा लोकांना शिक्षा करीन तेव्हा हे सर्वजण जमिनीवर फेकले जातील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
16 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “चौकात उभे राहा आणि पाहा. जुना रस्ता कोणता ते विचारा. चांगल्या रस्त्याची चौकशी करा व चांगल्या रस्त्यावरुन चाला. तुम्ही असे केल्यास तुमचा तुम्हाला विश्वास सापडेल. पण तुम्ही लोक म्हणाला आहात की, ‘आम्ही चांगल्या रस्त्यावरुन चालणार नाही.’
17 तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी रखवालदार निवडले. मी त्यांना सांगितले, ‘रणशिंगाचा आवाज ऐका.’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकणार नाही.’
18 तेव्हा सर्व राष्ट्रांनो, ऐका! त्या देशातील लोकांनो, लक्ष द्या.
19 पृथ्वीवरच्या लोकांनो, ऐका! यहुदातील लोकांवर मी अरिष्ट आणणार आहे. का? कारण त्यांनी हेतूपूर्वक दुष्कृत्ये केली. माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष केले, माझ्या आज्ञांचे पालन करण्याचे नाकारले.”
20 परमेश्वर म्हणतो, “तुम्ही शेबाहून माझ्यासाठी धूप कशाला आणता? दूरवरच्या देशातून सुगंधी काड्या कशाला आणता? तुम्ही आणलेल्या ह्या अग्नीत अर्पण करण्याच्या गोष्टी मला आनंदित करीत नाहीत. तुमचे यज्ञ मला संतुष्ट करीत नाहीत.”
21 मग परमेश्वर पुढे असे म्हणतो: “मी यहूदाच्या लोकांपुढे अडचणी निर्माण करीन. त्या वाटेत असलेल्या दगडाप्रमाणे असतील. वाटेतल्या दगडाला अडखळून लोक पडतात, त्याप्रमाणे वडील व मुले अडखळून पडतील. मित्र आणि शेजारी मरतील.”
22 परमेश्वर पुढे असे म्हणतो: “उत्तरेकडून सैन्य येत आहे. पृथ्वीवरच्या अतीदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे.
23 त्या सैनिकांजवळ धनुष्यबाण आहेत. ते क्रूर आहेत. त्यांना दया माहीत नाही. ते खूप शक्तिशाली आहेत. ते घोड्यावर स्वार होऊन येतात, तेव्हा समुद्राच्या गर्जनेसारखा आवाज येतो. ते युद्धाच्या तयारीने येत आहेत. सियोनच्या कन्ये, ते सैन्य तुझ्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे.
24 त्या सैन्याची बातमी आम्ही ऐकली आहे. आम्ही भीतीने गर्भगळीत झालो आहोत. आम्ही अडचणीत सापडलो आहोत असे वाटते. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे.
25 बाहेर शेतात जाऊ नका. रस्त्यावर जाऊ नका. का? कारण शत्रूजवळ तलवारी आहेत आणि सगळीकडे धोका आहे.
26 माझ्या लोकांनो, शोकवस्त्रे घाला. राखेत लोळा. मृतांसाठी आक्रोश करा. एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे आकांत करा. कारण नाश करणारा अगदी लवकरच आपल्याकडे येईल.
27 “यिर्मया, मी (देवाने) तुला धातू पारखणाऱ्याप्रमाणे केले आहे. तू माझ्या लोकांची परीक्षा कर आणि ते कसे जगतात त्यावर नजर ठेव.
28 माझे लोक माझ्याविरुद्ध गेले आहेत आणि ते दुराग्रही आहेत. ते लोकांबद्दल खोट्या गोष्टी बोलतात. ते सर्व दुष्ट आहेत. ते गंजलेल्या व कलंकित झालेल्या जस्त वा लोखंडाप्रमाणे आहेत.
29 चांदी शुद्ध करणाऱ्या कारागिराप्रमाणे ते आहेत. फुंकणीने जोरात फुंकताच विस्तवाचा जाळ झाला आणि त्यातून शिसे बाहेर आले.चांदी शुध्द करण्याच्या प्रयत्नात त्या कारागिराने आपला वेळ वाया घालविला. त्याचप्रमाणे माझ्या लोकांमधून दुष्टपणा काढला गेला नाही.
30 माझ्या लोकांना, ‘टोकाऊ चांदी’ असे म्हटले जाईल. देवाने त्यांचा स्वीकार केला नाही म्हणून त्यांना हे नाव दिले जाईल.”