1 परांगंदा अवस्थेच्या काळातील अकराव्या वर्षी, महिन्याच्या पहिल्याच दिवशी, मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, सोरने यरुशलेमबद्दल वाईट उद्गार काढले. ती म्हणाली, ‘अहा! लोकांचे रक्षण करणाऱ्या प्रवेशद्वाराचा नाश झाला आहे. आता मला द्वार मोकळे झाले आहे. नगरीचा (यरुशलेमचा) नाश झाला. त्यामुळे तेथून मला खूप मौल्यवान वस्तू मिळतील.”
3 म्हणून, प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो, “सोर, मी तुझ्याविरुद्ध आहे. तुझ्याशी लढण्यासाठी मी खूप राष्ट्रांना आणीन. काठावर पुन्हा पुन्हा येणाऱ्या लाटांप्रमाणे ते पुन्हा पुन्हा येतील.”
4 देव म्हणाला, “ते शत्रुसैनिक सोरच्या तटबंदीचा नाश करतील आणि तिचे बुरुज पाडून टाकतील. मी तिच्या वरचा मातीचा थर खरवडून टाकीन व तिचा खडक करीन.
5 मी सांगतो की ती समुद्रकाठची कोळ्यांची जाळी पसरविण्याची जागा होईल.” परमेश्वरा, माझा प्रभू, म्हणतो, “सोर म्हणजे सैनिकांची मौल्यवान लूट होईल.
6 तिच्या मुख्य भूप्रदेशावरच्या मुली (लहान गावे) लढाईत मारल्या जातील. मगच त्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे.”
7 परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “सोरवर उत्तरेकडून शत्रू आणीन. तो म्हणजेच बाबेलचा राजाधिराज नबुखद्नेस्सर होय. तो प्रंचड सैन्य घेऊन येईल. त्यात घोडे, रथ, घोडेस्वार व इतर पुष्कळ सैनिक असतील. ते सैनिक पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतील असतील.
8 नबुखद्नेस्सर मुख्य भूप्रदेशावरील तुझ्या मुलींना (लहान गावांना) ठार करील. तो तुझ्या शहरावर हल्ला करण्यासाठी बुरुज बांधील. तो तुझ्या शहराभोवती मातीचा रस्ता तयार करील. तटबंदीपर्यंत जाणारा मातीचा मार्ग तो बांधेल.
9 तट पाडण्यासाठी तो ओंडके आणील. कुदळीने तुझे बुरुज तो पाडील.
10 त्याच्याजवळ इतके घोडे असतील की त्यांच्या टापांनी उडालेली धूळ तुला झाकून टाकील. तुझ्या वेशीतून बाबेलचा राजा जेव्हा प्रवेश करील, तेव्हा घोडेस्वार, गाडे, रथ यांच्या खडखडाटाने तुझे तट हादरतील. हो! तटबंदी पाडून ते तुझ्या शहरात शिरतील.
11 बाबेलचा राजा घोड्यावर स्वार होऊन शहरात फिरेल. त्यांच्या घोड्यांच्या टापा (खूर) तुझे रस्ते तुडवितील. तो तलवारीच्या वारांनी लोकांना ठार करील. शहरातील तुझे भक्कम स्तंभ जमीनदोस्त होतील.
12 नबुखद्नेस्सरचे लोक तुमची संपत्ती लुटतील. तुमचा मला बळकावतील. ते तट उद्ध्वस्त करतील आणि तुमच्या सुंदर घरांचा नाश करतील. ते घरांच्या विटा, दगड, तुळ्या कचऱ्याप्रमाणे समुद्रात टाकतील.
13 मी तुझे आनंदगान बंद पाडीन. लोकांना पुन्हा कधीही तुझ्या कडून सांरंगीचे सूर ऐकू येणार नाहीत.
14 मी तुझे रुपांतर उघड्या वाघड्या खडकात करीन. तू म्हणजे समुद्रकाठची कोळ्यांचे जाळे पसरवून ठेवण्याची जागा होशील. तुझी पुन्हा उभारणी होणार नाही. का? कारण मी, परमेश्वर असे म्हणतो म्हणून!” प्रभू, माझा परमेश्वर, असे म्हणाला.
15 परमेश्वर, माझा प्रभु, सोरला म्हणतो, “तुझे लोक जखमी होतील व मारले जातील तेव्हा तुझे पतन होईल. त्याच्या आवाजाने भूमध्य सुमुद्राकाठचे देश थर थर कापतील.
16 मग समुद्रकाठाजवळच्या देशांतील सर्व नेते आपला शोक प्रकट करण्यासाठी सिंहासनावरुन खाली उतरतील. ते त्यांचे खास पोशाख उतरवितील. सुंदर वस्त्रे काढून ठेवतील. मग ते ‘थरकापाची (भीतीची) वस्त्रे’ घालतील आणि भीतीने कापत जमिनीवर बसतील. तुझा इतका लवकर नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
17 ते तुझ्यासाठी पुढील शोकगीत गातील.“हे सोर, तू प्रसिद्ध नगरी होतील.तुझ्यात राहण्यासाठी लोक समुद्रपार करुन आले.तू प्रसिद्ध होतीस पण आता तू संपली आहेस समुद्रावर तुझा आणि तुझ्या लोकांचा वचक होता. मुख्य भूप्रदेशावर राहणाऱ्या लोकांवर तुझा दरारा होता.
18 आता, तू पडताच, समुद्रकाठच्या देशांचा भीतीने थरकाप उडेल. तू समुद्रकिनारी अनेक वसाहती स्थापिल्यास. तुझा नाश झाल्यावर, ते सर्व लोक भयभीत होतील.”
19 परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो, “सोर, मी तुझा नाश करीन. तू एक जुनाट, ओसाड शहर होशील. तेथे कोणीही राहणार नाही. मी तुझ्यावर समुद्राची भरती आणीन. प्रचंड समुद्राखाली तू झाकली जाशील.
20 मी तुला मृत राहतात तेथे म्हणजे पाताळात घालवीन. पूर्वी मेलेल्यांमध्ये तू सामील होशील. इतर जुनाट, ओसाड शहरांप्रमाणे मी तुला पृथ्वीच्या तळाशी पाठवीन. तू त्या सर्वांबरोबर थडग्यात राहशील. मग तुझ्यात कोणीही वस्ती करणार नाही. तू पुन्हा कधीही वसणार नाहीस.
21 तुझी स्थिती पाहून इतर लोक घाबरतील. तू संपशील. लोक तुला शोधतील, पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस” असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो.