1 मला परमेश्वराचा संदेश मिळाला तो म्हणाला,
2 “मानवपुत्रा, ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो,’ असे सोरच्या राजाला सांग:“तू फार गर्विष्ठ आहेस. तू म्हणतोस “मी देव आहे. समुद्राच्या मध्यभागी मी देवाच्या आसनावर बसतो.”“पण तू मानव आहेस, देव नाही. तुला आपण देव आहोत असे फक्त वाटते.
3 तू स्वत:ला दानीएलापेक्षा बुद्धिमान समजतोस तू सर्व रहस्ये शोधू शकतोस असे तुला वाटते.
4 तू तुझ्या शहाणपणाने व अकलेने स्वत:साठी संपत्ती गोळा केली आहेस. तुझ्या खाजिन्यांत तू चांदी-सोने ठेवले आहेस.
5 तुझ्या शहाणपणाने आणि व्यापारामुळे तुझी संपत्ती वाढली आणि आता तुला त्यांचाच गर्व झाला आहे.
6 “म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:सोर, तू स्वत:ला देवासारखी मसजतेस!
7 मी परक्यांना तुझ्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन. ते राष्ट्रांमध्ये सर्वांत भयंकर आहेत. ते तलवारी उपसतील आणि तुझ्या शहाणपणाने मिळविलेल्या सर्व सुंदर गोष्टींचा नाश करतील. तुझे वैभव ते लयाला घालवितील.
8 “ते तुला थडग्यात पोहोचवतील समुद्रात मेलेल्या नावाड्याप्रमाणे तुझी स्थिती होईल.
9 माणूस तुला ठार मारेल. तरी तू त्याला “मी देव आहे.” असे म्हणशील का? नाही तो तुला ताब्यात घेईल. मग तुला समजेल की तू मानव आहेस, देव नव्हे!
10 परका तुला परदेशीयांसारखेवागवेल आणि ठार करील. माझ्या आज्ञेमुळे ह्या गोष्टी घडतील.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
11 मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले तो म्हणाला,
12 “मानवपुत्रा, सोरच्या राजाविषयीचे पुढील शोकगीत गा. त्याला सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो“‘तू एक आदर्श माणूस होतास. तू ज्ञानी होतास. तू अतिशय देखणा होतास.
13 तू एदेनमध्ये राहात होतास. एदेन हा देवाचा बाग आहे. तुझ्याजवळ माणके, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, सूर्यंकांत मणी, नीलमणी, वैदूर्य पाच अशी सर्व प्रकारची मोल्यवान रत्ने होती, आणि ती सर्व सोन्याच्या कोंदणात बसविलेली होती. ज्या दिवशी तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला हे सौदंर्य देण्यात आले. देवाने तुला सामर्थ्यशाली केले.
14 तू एक अभिषिक्त करुब होतास तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत. मी तुला देवाच्या पवित्र पर्वतावर ठेवी. तू रत्नांतून हिंडत होतास आणि अग्नीप्रमाणे तळपत होतास.
15 मी तुला निर्मिले, तेव्हा तू सज्जन व प्रामाणिक होतास. पण नंतर तू दुष्ट झालास.
16 तुझ्या व्यापाराने तुला खूप संपत्ती मिळवून दिली खरी, पण त्याने तुझ्यात क्रूरपणा निर्माण झाला, आणि तू पाप केलेस. म्हणून मी तुला एखाद्या घाणेरड्या गोष्टीसारखी वागणूक दिली. मी तुला देवाच्या पर्वतावरुन फेकून दिले. तू एक खास अभिषिक्त करुब देवदूत होतास, तुझे पंख माझ्या सिंहासनावर पसरत होते, पण मी तुला, अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेल्या रत्नांपासून, सक्तीने दूर केले.
17 तुझ्या सौंदर्यांने तुला गर्विष्ठ बनविले. तुझ्या वैभवाने तुझ्या ज्ञानाचा नाश केला. म्हणून मी तुला खाली जमिनीवर लोटले. आता इतर राजे तुझ्याकडे डोळे विस्फारुन पाहतात.
18 तू खूप चुका केल्यास तू कपटी व्यापारी झालास आणि अशा तऱ्हेने, तू पवित्र स्थान अपवित्र केलेस. म्हणून मी तुझ्यातील आगीनेच तुला जाळीन. जमिनीवर तू राख होऊन पडशील. आता सर्वजण तुझी लाजिरवाणी स्थिती पाहू शकतात.
19 तुझी अशी स्थिती पाहून इतर राष्ट्रांतील लोकांना धक्का बसला. तुझ्या बाबतीत जे घडले, ते पाहून लोक भयभीत होतील. तुझा शेवट झाला!”
20 मला परमेश्वराचा संदेश मिळाला, तो म्हणाला,
21 “मानवपुंत्रा, सीदोनकडे पाहा व माझ्यावतीने तिच्याविरुद्ध असलेला संदेश तिला दे.
22 सांग, ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो.“सीदोन, मी तुझ्याविरुद्ध आहे! तुझे लोक माझा मान राखायला शिकतील. मी सिदोनला शिक्षा करीन. मग लोकांना कळेल की मीच परमेश्वर आहे, मी पवित्र आहे. व ते त्याप्रमाणे माझ्याशी आचरण करतील.
23 मी सीदोनला रोगराई व मृत्यू पाठवीन. शहराबाहेरील तलवार (शत्रूसैनिक) तो मृत्यू आणील. मगच त्यांना कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.”
24 “इस्राएलच्या सभोवतालच्या देशांनी इस्राएलचा तिरस्कार केला. पण त्यांचे वाईट होईल. मग इस्राएलच्या लोकांना बोचणारे तीक्ष्ण सुरे वा काटेरी झुडुपे उरणार नाहीत, व त्यांना समजून येईल की मीच परमेश्वर, त्यांचा प्रभू आहे.”
25 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “मी इस्राएलच्या लोकांना इतर राष्ट्रांत विखुरविले. पण मी पुन्हा त्यांना एकत्र आणीन मग त्या राष्ट्रांना मी पवित्र असल्याचे कळेल व ते माझ्याशी त्याप्रमाणे वागतील. त्या वेळी, माझा सेवक याकोब याला मी दिलेल्या भूमीवर इस्राएल लोक राहतील.
26 “ते त्या भूमीवर सुरक्षितपणे राहतील. ते घरे बांधतील व द्राक्षमळे लावतील. त्यांचा तिरस्कार करणाऱ्या सभोवतालच्या राष्ट्रांना मी शिक्षा करीन. मग इस्राएलचे लोक निर्भयपणे राहतील व त्यांना पटेल की मीच त्यांचा परमेश्वर देव आहे.”