1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या. देवाचे प्रेम सदैव राहील.
2 परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही. देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
3 जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात. ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात.
4 परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव. मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.
5 परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे. मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे. मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.
6 आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले. आम्ही चुकलो. आम्ही दुष्कृत्ये केली.
7 परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत. ते लाल समुद्राजवळ होते तेव्हा आमचे पूर्वज तुझ्याविरुध्द गेले.
8 परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर, देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
9 देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला. देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.
10 देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले. देवाने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली.
11 देवाने त्यांच्या शत्रूंना समुद्रात झाकून टाकले. शत्रूंपैकी एकही जण सुटू शकला नाही.
12 नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला. त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.
13 परंतु आमचे पूर्वज लवकरच देवाने केलेल्या गोष्टी विसरले त्यांनी देवाचा उपदेश ऐकल नाही.
14 आमचे पूर्वज वाळवंटात भुकेले झाले आणि त्यांनी शुष्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली.
15 परंतु देवाने त्यांना त्यांनी मागितलेल्या गोष्टी दिल्या. पण त्याने त्यांना भयानक रोगही दिला.
16 लोकांना मोशेचा मत्सर वाटला. त्यांनी अहरोनचा, परमेश्वराच्या पवित्र याजकाचा हेवा केला.
17 म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली. जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले. नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले.
18 नंतर अग्नीने त्या जमावाला जाळले. अग्नीने त्या दुष्टांना जाळून टाकले.
19 त्या लोकांनी होरेब पर्वतावर सोन्याचे वासरु केले. त्यांनी मूर्तीपूजा केली.
20 त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाऱ्या बैलाच्या मूर्तीबरोबर अदलाबदल केली.
21 देवाने आमच्या पूर्वजांना वाचवले. पण ते मात्र त्याला पूर्णपणे विसरले. ज्या देवाने मिसरमध्ये चमत्कार केलेत्या देवाला ते विसरले.
22 देवाने हामच्या देशात अद्भुत गोष्टी केल्या. देवाने लाल समुद्राजवळ भयानक गोष्टी केल्या.
23 देवाला त्या लोकांचा नाश करायची इच्छा होती. परंतु मोशेने त्याला थोपवले. मोशे देवाचा निवडलेला सेवक होता. देव खूप रागावला होता. पण मोशेने त्याचा मार्ग अडविला म्हणून देवाने लोकांचा नाश केला नाही.
24 परंतु नंतर त्या लोकांनी कनानच्या सुंदर देशात जायला नकार दिला. त्या देशात राहाणाऱ्या लोकांचा पराभव करायला देव मदत करेल यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला.
25 आमच्या पूर्वजांनी देवाचे ऐकायला नकार दिला.
26 म्हणून देवाने शपथ घेतली की ते वाळवंटात मरतील.
27 देवाने वचन दिले की मी दुसऱ्या लोकांना त्यांच्या वंशजांचा पराभव करु देईन. देवाने वचन दिले की मी आमच्या पूर्वजांना भिन्नभिन्न राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
28 नंतर बआल पौर येथे देवाचे लोक बआलची पूजा करण्यास एकत्र जमले. ते जंगली भोजनावळीत सामील झाले आणि मेलेल्यालोकांना अर्पण केलेले बळी त्यांनी खाल्ले.
29 देव त्याच्या माणसांवर खूप रागावला, देवाने त्यांना खूप आजारी पाडले.
30 पण फीनहासने देवाची प्रार्थना केलीआणि देवाने आजार थांबवला.
31 फीनहासने चांगली गोष्ट केली हे देवाला माहीत होते. देव याची सदैव आठवण ठेवील.
32 मरीबा येथे लोक खूप रागावले आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.
33 त्या लोकांनी मोशेला खूप अस्वस्थ केले म्हणून मोशे विचार करण्यासाठी न थांबता बोलला.
34 परमेश्वराने लोकांना कनानमध्ये राहाणाऱ्याइ तर देशाचा नाश करायला सांगितले. पण इस्राएलाच्या लोकांनी देवाची आज्ञा पाळली नाही.
35 ते इतर लोकांत मिसळले आणि ते लोक जे करीत होते तेच त्यांनीही केले.
36 ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले. ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली.
37 तचीच मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली.
38 देवाच्या माणसांनी निरपराध लोकांना ठार मारले. त्यांनी स्वतच्या मुलांना ठार मारले आणि त्यांना त्या खोट्या देवाला अर्पण केले.
39 म्हणून देवाची माणसे त्या इतर माणसांबरोबर अमंगल झाली. देवाची माणसे त्यांच्या देवाशी प्रामाणिक राहिली नाहीत आणि इतर लोकांनी जी कृत्ये केली तीच त्यांनीही केली.
40 देव त्याच्या माणसांवर रागावला. देवाला त्यांचा कंटाळा आला.
41 देवाने त्याच्या माणसांना इतर देशांना देऊन टाकले. देवाने त्याच्या शत्रूंना त्यांच्यावर राज्य करु दिले.
42 देवाच्या माणसांच्या शत्रूंनी त्यांना आपल्या काबूत ठेवले आणि त्यांचे आयुष्य कठीण केले.
43 देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले. पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.
44 पण जेव्हा जेव्हा देवाची माणसे संकटात होती तेव्हा तेव्हा त्यांनी देवाला मदतीसाठी हाक मारली आणि प्रत्येक वेळी देवाने त्यांची प्रार्थना ऐकली.
45 देवाने नेहमी आपल्या कराराची आठवण ठेवली आणि आपल्या महान प्रेमाने त्यांचे सात्वन केले.
46 इतर देशांनी त्यांना कैदी बनवले पण देवाने त्यांना त्याच्या माणसांशी दयाळू राहायला सांगितले.
47 परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करु.
48 परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”