1 परमेश्वरा, माझे शब्द ऐक. मी जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते समजून घे.
2 माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक.
3 परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो. मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.
4 देवा, तुला वाईट गोष्टी आवडत नाहीत. वाईट लोकांनी तुझ्या जवळ असणे तुला आवडत नाही. वाईट लोक तुझी उपासना करु शकत नाहीत.
5 मूर्ख तुझ्याकडे येऊ शकत नाहीत. जे लोक नेहमी दुष्टपणा करतात त्यांना तू दूर पाठवतोस.
6 जे लोक खोटं बोलतात त्यांचा तू सर्वनाश करतोस. जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी गुप्त योजना आखतात ते परमेश्वराला आवडत नाहीत, परमेश्वर त्यांचा द्वेष करतो.
7 परमेश्वरा, मी तुझ्या विपुल कृपेमुळे तुझ्या मंदिरात येईन. मी पवित्र मंदिरात भीतीपोटी आणि तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नतमस्तक होईन.
8 परमेश्वरा, तू मला जगण्याचा खरा मार्ग दाखवलोक माझ्यातल्या दुबळेपणाच्या शोधात असतात. म्हणून कसे जगावे ते तू मला दाखव.
9 ते लोक खरे बोलत नाहीत. ते खऱ्याचे खोटे करणारे खोटारडे आहेत त्यांची तोंडे रिकाम्या थडग्यासारखी आहेत ते लोकांशी चांगलं बोलतील पण तेही त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठीच.
10 देवा, तू त्यांना शिक्षा कर. त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे. ते लोक तुझ्याविरुध्द गेले आहेत. म्हणून तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल शिक्षा कर.
11 परंतु जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना सुखी राहू दे. त्यांना कायमचे सुखी कर. देवा, ज्या लोकांना तुझे नांव आवडते त्यांचे रक्षण कर त्यांना शक्ती दे.
12 परमेश्वरा, जेव्हा तू चांगल्या माणसांसाठी चांगल्या गोष्टी करतोस तेव्हा तू त्यांचे रक्षण करणाऱ्या मोठ्या ढालीसारखा आहेस.