1 परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.
2 कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. दयेखातर माझी प्रार्थना ऐक.
3 माझ्या आत्म्याला हे दु:ख पुरेसे आहे. मी आता लवकरच मरणार आहे.
4 लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात. मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात.
5 मला तू मृत माणसात शोध. मी थडग्यात असलेल्या प्रेतासारखा आहे. ज्याला तू विसरलास असा एक मृतात्मा, तुझ्यापासून आणि तुझ्या निगराणीपासून दूर गेलेला असा एक.
6 तू मला जमिनीतल्या त्या खड्यांत टाकलेस. होय, तूच मला त्या अंधाऱ्या जागेत ठेवलेस.
7 देवा, तू माझ्यावर रागावला होतास आणि तू मला शिक्षा केलीस.
8 माझे मित्र मला सोडून गेले. ज्याला कोणीही स्पर्श करु इच्छीत नाही. अशा माणसाप्रमाणे ते मला टाळतात. मी घरात बंद झालो आहे आणि मी बाहेर पडू शकत नाही.
9 अति द:ुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.
10 परमेश्वरा, तू मृतांसाठी चमत्कार करतोस का? भुते उठून तुझी स्तुती करतात का? नाही.
11 थडग्यातले मृत लोक तुझ्या प्रेमाबद्दल बोलू शकत नाहीत. मृत्युलोकातील मृतलोक तुझ्या इमानीपणाविषयी बोलू शकत नाहीत.
12 अंधारात पडलेले मृतलोक तुझी अद्भुत कृत्ये पाहू शकत नाहीत. विस्मृतीच्या जगातले मृतलोक तुझ्या चांगुलपणाविषयी बोलू शकत नाहीत.
13 परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे. प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो.
14 परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू माझे ऐकायला नकार का देतोस?
15 मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.
16 परमेश्वरा, तू माझ्यावर रागावला होतास आणि शिक्षा मला मारुन टाकीत आहे.
17 दु:ख आणि वेदना सदैव माझ्याबरोबर असतात. मी माझ्या दु:खात आणि वेदनात बुडून मरत आहे असे मला वाटते.
18 आणि परमेश्वरा, तूच माझ्या आप्तेष्टांना आणि इष्ट मित्रांना मला सोडून जाण्यास भाग पाडलेस. केवळ भयाण अंधकार माझी सोबत करत माझ्याजवळ राहिला.