Home |  | Audio |  | Index |  | Verses

यशया / Isaiah

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66
1 अन्यायकारक कायदे करणाऱ्यांकडे पाहा घातक निर्णय लिहिणाऱ्या लेखकांकडे पाहा, लोकांना जगणे कठीण होईल असे कायदे ते करतात.
2 ते गरिबांशी न्यायाने वागत नाहीत. गरिबांचे हक्क ते डावलतात. विधवांना व अनाथांना लुबाडण्यास ते लोकांना मुभा देतात.
3 कायदे करणाऱ्यांनो, तुम्हाला तुमच्या कृत्याचा जाब द्यावा लागेल, तेव्हा तुम्ही काय सांगाल? दूरच्या देशातून तुमचा विध्वंस येत आहे. तेव्हा मदतीसाठी कोठे धावाल? तुमची धनसंपत्ती तेव्हा उपयोगी पडणार नाही.
4 कैद्याप्रमाणे तुम्हाला वाकावे लागेल, मृताप्रमाणे तुम्हाला जमिनीवर पडावे लागेल. पण एवढ्यानेही भागणार नाही. कारण अजूनही देवाचा राग शांत झाला नसेल. अजूनही देव शिक्षा करण्याच्या तयारीत असेल.
5 देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन.
6 पापे करणाऱ्या लोकांविरूध्द लढण्यासाठी मी अश्शूरला पाठवीन. मला त्या लोकांचा अतिशय राग आला आहे म्हणून मी अश्शूरला त्यांच्यावर चाल करून जाण्याची आज्ञा करीन. अश्शूर त्यांचा पराभव करील व त्यांची सर्व संपत्ती लुटून नेईल. रस्त्यातील कचऱ्याप्रमाणे इस्राएल अश्शूरच्या पायाखाली तुडविला जाईल.
7 “पण मी अश्शूरचा उपयोग करून घेणार आहे हे त्याला कळत नाही. मी त्याचा साधन म्हणून उपयोग करीन असे त्याच्या लक्षात येत नाही. अश्शूरला फक्त इतर लोकांचा नाश करायचा आहे, खूप राष्ट्रांचा घात करण्याचा त्याचा बेत आहे.
8 कदाचित् आपण जिंकलेल्या आणि त्याच्या हुकमतीखाली असलेल्या प्रदेशांच्या राजांचा अश्शूर येथे निर्देश करत असेल. अश्शूर स्वत:शीच म्हणतो, ‘माझे सर्व राजपुत्र राजेच नाहीत का?
9 कालनो शहर कर्कमीश शहरासारखे, हमाथ अर्पादसारखे व शोमरोन दमास्कससारखे आहे.
10 मी त्या दुष्ट राज्यांचा पराभव केला आणि आता मी त्यांच्यावर सत्ता गाजवितो. त्यांच्या पूजेच्या मूर्ती यरूशलेममधील व शोमरोनमधील मूर्तीपेक्षा चांगल्या आहेत.
11 मी शोमरोनचा व तेथील मूर्तीचा पराभव केला. तसेच मी यरूशलेमचे करीन.”‘
12 सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील.
13 अश्शूरचा राजा म्हणतो, “मी फार सुज्ञ आहे. माझ्या चातुर्याच्या व सामर्थ्याच्या बळावर मी फार मोठ्या गोष्टी केल्या आहेत. मी पुष्कळ राष्ट्रंाना पराभूत केले आहे. मी त्यांची संपत्ती लुटली आणि तेथील लोकांना गुलाम केले. मी फार सामर्थ्यवान आहे.
14 पक्ष्याच्या घरट्यातून एखाद्याने सहज अंडी काढून घ्यावीत त्याप्रमाणे माझ्या ह्या दोन हातांनी ह्या सवंर्ाची संपत्ती घेतली आहे. पक्षी नेहमी घरटी व अंडी सोडून जातो. आणि घरट्याचे रक्षण करण्यास कोणीच नसते. तेथे एकही पक्षी चिवचिवाट करायला अथवा पंख व चोच ह्याने टोचा मारायला नसतो. त्यामुळे लोक सहज अंडी काढून घेऊ शकतात. अगदी असेच मी सर्व जगातील माणसांना लुटले. मला थांबविणारा कोणीही नव्हता.”
15 कुऱ्हाड चालविणाऱ्यापेक्षा, कुऱ्हाड श्रेष्ठ नसते. करवत, कापणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान आहे. एखाद्या माणसाने एखादी काठी उचलून तिने एखाद्याला शिक्षा करावी व त्याबद्दल काठीने स्वत:ला त्या माणसापेक्षा श्रेष्ठ व सामर्थ्यवान समजावे, तसेच हे आहे.
16 अश्शूर स्वत:ला श्रेष्ठ समजतो पण सर्वशक्तिमान परमेश्वर एक भयानक रोग अश्शूरमध्ये पसरवील. ज्याप्रमाणे रोगी माणसाचे वजन घटते, त्याप्रमाणे अश्शूरचे वैभव व सामर्थ्य घटेल. नंतर अश्शूरचे वैभव नष्ट होईल. तो रोग सर्वभक्षक आगीप्रमाणे असेल.
17 इस्राएलचा प्रकाश (देव) अग्नीप्रमाणे होईल. पवित्र देव ज्वालेप्रमाणे होईल. तण व काटेकुटे प्रथम जाळणाऱ्या आग्रीप्रमाणे तो असेल.
18 नंतर आग पसरते आणि मोठे वृक्ष, द्राक्षमळे जळून जातात. व सर्वांत शेवटी प्रत्येक गोष्ट जळून नष्ट होते-अगदी माणसेसुध्दा, तसेच तेव्हा होईल आणि अश्शूरचा देवाकडून नाश होईल. अश्शूर कुजणाऱ्या ओंडक्याप्रमाणे होईल.
19 हाताच्या बोटावर मोजण्याइतके वृक्ष जंगलात उभे असतील. लहान मूलही ते मोजू शकेल.
20 त्यावेळी याकोबचे जे वंशज इस्राएलमध्ये राहत असतील ते त्यांना मारणाऱ्या माणसावर अवलंबून राहणे सोडतील आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर मनापासून श्रध्दा ठेवायला शिकतील.
21 याकोबचे हे राहिलेले वंशज पुन्हा सामर्थ्यशाली देवाला अनुसरतील.
22 समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे तुझे लोक खूप असले तरी त्यातील फक्त थोडेच परमेश्वराकडे परत येतील. ते देवाकडे वळतील पण त्यापूर्वी देशाचा नाश केला जाईल. देवाने घोषित केले आहे की तो देश उध्वस्त करणार आहे. नंतर चांगुलपणा देशात येईल. तो दुथडीभरून वाहाणाऱ्या नदीसारखा असेल.
23 माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, निश्चित ह्या संपूर्ण प्रदेशाचा नाश घडवून आणील.
24 माझा प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो, “माझ्या सीयोनवासीयांनो, अश्शूरला घाबरू नका. मिसरने पूर्वी तुम्हाला जसे हरविले होते तसेच अश्शूर तुम्हाला हरवील. जणू काही अश्शूर तुम्हाला काठीने मारील.
25 पण थोड्या काळात माझा राग शांत होईल. अश्शूरने तुम्हाला दिलेली शिक्षा मला पुरेशी वाटेल.”
26 पूर्वी सर्वशक्तिमान परमेश्वराने मिद्यानला ओरेबाच्या खडकाजवळ हरविले होते, त्याप्रमाणेच परमेश्वर अश्शूरवर हल्ला करून त्याला चाबकाने फोडून काढील. पूर्वी परमेश्वराने मिसरला शिक्षा करताना, आपल्या हातातील दंडाने समुद्र दुभंगून आपल्या लोकांना समुद्रपार केले व मिसरच्या लोकांना बुडविले. अशाच तऱ्हेने परमेश्वर अश्शूरपासून आपल्या लोकांना
27 अश्शूर तुझ्यावर जी संकटे आणील ती तुला ओझ्याप्रमाणे अथवा जोखंडाप्रमाणे खांद्यावर वाहावी लागतील पण लवकरच ते ओझे उतरविले जाईल. तुझे सामर्थ्य (देव) ते जोखंड मोडून टाकील.
28 अश्शूरचे सैन्य अयाथ जवळून (“भग्न अवशेष” जवळून) प्रवेश करील. मिग्रोन (“मळणीची जागा”) तुडवून ते जाईल. मिखमाशात (“गुदामात”) ते आपले अन्नधान्य ठेवील.
29 ते ‘उताराच्या’ (माबाराच्या) येथे नदी ओलांडतील, गेबा येथे ते मुक्काम करतील. रामा घाबरून जाईल. शौलच्या गिबातील माणसे पळून जातील.
30 बाथ गल्लीम, मोठ्याने ओरड, लईशा, ऐक, अनाथोथ, मला उत्तर दे.
31 मदमेनाचे रहिवासी पळत आहेत. गेबीमचे रहिवासी लपून बसत आहेत.
32 ह्या दिवशी सैन्य नोब येथे मुक्काम करील आणि यरूशलेममधील टेकडी सीयोन हिच्याविरूध्द लढण्याची तयारी करील.
33 लक्ष द्या. आपला प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, प्रचंड वृक्ष (अश्शूर) कापून टाकील. आपल्या सामर्थ्याच्या बळावर देव हे करील. श्रेष्ठ व प्रतिष्ठित लोकांचे महत्व तो कमी करील.
34 परमेश्वर त्याच्या कुऱ्हाडीने जंगल तोडील आणि लबानोनमधील प्रचंड वृक्ष (प्रतिष्ठित लोक) कोसळतील.

या Top | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]