Home |  | Audio |  | Index |  | Verses

यशया / Isaiah

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66
1 “मी सियोनवर प्रेम करतो. म्हणून मी तिच्यावतीने बोलेन. मी यरूशलेमवर प्रेम करतो म्हणून मी बोलायचे थांबणार नाही. चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण तेजस्वी ज्योतीप्रमाणे जळायला लागेपर्यंत मी बोलेन.
2 मग सगळी राष्ट्रे तुझा चांगुलपणा पाहतील. सर्व राजे तुझी प्रतिष्ठा पाहतील मग तुला नवे नाव मिळेल. परमेश्वर स्वत:तुला नवे नाव ठेवील.
3 परमेश्वराला तुझा फार अभिमान वाटेल. तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील.
4 ‘देवाने त्याग केलेली माणसे’ असे तुम्हाला कधीही कोणी म्हणणार नाही. तुमच्या भूमीला ‘देवाने नाश केलेली’ असे कोणी केव्हाही म्हणणार नाही. उलट, तुम्हाला ‘देवाची आवडती माणसे’ असे म्हणतील तुमच्या भूमीला ‘देवाची वधू’ म्हणतील. का? कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची भूमी त्याच्या मालकीची आहे.
5 एखादा तरूण एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो. मग तो तिच्याशी लग्न करतो व ती त्याची पत्नी होते. त्याचप्रमाणे ही भूमी तुझ्या मुलांची होईल. नवविवाहित माणूस खूप सुखी असतो, तसाच देव तुझ्याबरोबर सुखी होईल.”
6 “यरूशलेम, तुझ्या वेशीवर मी रखवालदार (संदेष्टा) ठेवतो. ते रखवालदार गप्प बसणार नाही. रांत्रदिवस ते प्रार्थना करीत राहतील.” रखवालदारांनो, तुम्ही देवाची प्रार्थना करीत राहिले पाहिजे त्याच्या वचनाची आठवण तुम्ही त्याला करून दिली पाहिजे. कधीही प्रार्थना करायचे थांबू नका.
7 पृथ्वीवरच्या सर्व लोकांनी स्तुती करण्याइतपत यरूशलेमला परमेश्वर प्रशंसनीय करीपर्यंत तुम्ही त्याची प्रार्थना केली पाहिजे.
8 परमेश्वराने वचन दिले. परमेश्वराचे सामर्थ्य हाच त्या वचनाचा पुरावा आहे, व ते वचन पूर्ण करायला परमेश्वर आपले सामर्थ्य वापरील. परमेश्वर म्हणतो, “तुमचे अन्न आणि तुम्ही बनविलेले मद्य मी तुमच्या शत्रूंना पुन्हा देणार नाही, असे मी तुम्हाला वचन देतो.
9 जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील द्राक्षे गोळा करणारा त्या द्राक्षापासून निघणारे मद्य पिईल. हे सर्व माझ्या पवित्र भूमीवर घडेल.”
10 दरवाजातून आत या लोकांसाठी रस्ता मोकळा करा. रस्ता तयार करा. रस्त्यावरील दगड बाजूला काढा. लोकांकरिता निशाणी म्हणून ध्वज उंच उभारा.
11 ऐका! परमेश्वर दूरवरच्या देशांशी बोलत आहे “सियोनच्या लोकांना सांगा, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. त्याचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्याचे कर्म त्याच्या समोर आहे.”
12 त्याच्या लोकांना “पवित्र लोक”, “परमेश्वराने वाचविलेले लोक” असे म्हटले जाईल व यरूशलेमला “देवाला हवी असणारी नगरी,” “देव जिच्या बरोबर आहे ती नगरी” असे म्हटले जाईल.

या Top | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]