1 पूर्वी लोकांनी जबुलून व नफताली या प्रांताना महत्व दिले नाही पण पुढील काळात देव त्या भूमीला श्रेष्ठ बनवील समुद्राजवळील भूमी, यार्देन नदीच्या पलीकडचा प्रदेश व यहुदी सोडून दुसरे जे लोक राहतात तो गालील प्रदेश म्हणजे ही भूमी होय.
2 आता तेथील लोक अधोलोका सारख्या अंधकारात दिवस कंठीत आहेत पण ते तेजस्वी प्रकाश पाहतील. पाताळासारख्या अंधकारमय प्रदेशात सध्या ते लोक राहत आहेत पण त्यांना “तेजस्वी प्रकाश” दिसेल.
3 देवा, तूच राष्ट्राच्या वाढीचे कारण होशील, तेथल्या लोकांना तू सुखी करशील ते लोक त्यांचा आनंद तुझ्याजवळ व्यक्त करतील. सुगीच्या काळातील आनंदासारखा हा आनंद असेल. जेव्हा लोक लढाईतील जिंकलेल्या गोष्टींचा वाटा घेतात तेव्हा होणाऱ्या आनंदाप्रमाणे हा आनंद असेल.
4 असे का? कारण तू त्यांचा मोठा भार उतरवशील. त्यांच्या पाठीवरील जोखड काढून घेशील, तुझ्या लोकांना शिक्षा करण्यासाठी शत्रू वापरीत असलेली छडी तू काढून घेशील. तू मिद्यानचा पराभव केलास त्या वेळेप्रमाणेच ही स्थिती असेल.
5 लढाईत वापरलेला प्रत्येक बूट आणि रक्ताळलेला प्रत्येक गणवेश ह्यांचा नाश होईल. ह्या गोष्टींची होळी केली जाईल.
6 असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”
7 त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.
8 याकोबाच्या (इस्त्राएलच्या) लोकांविरूध्द माझ्या परमेश्वराने आज्ञा दिली आहे. ती खरी ठरेल.
9 मग एफ्राइमच्या (इस्राएलच्या) प्रत्येक माणसाला, एवढेच नव्हे तर शोमरोनच्या नेत्यांना कळून चुकेल की देवाने आपल्याला शिक्षा केली आहे.सध्या ती माणसे गर्विष्ठ व बढाईखोर झाली आहेत, ते म्हणतात.
10 “ह्या विटा पडल्या तर आम्ही पुन्हा बांधकाम करू आणि तेही भक्कम दगडांचे, ही लहान झाडे कापली जातील पण आम्ही त्यांच्या जागी उंच व भक्कम असे नवे वृक्ष लावू.”
11 म्हणून परमेश्वर इस्राएलच्याविरूध्द लढण्यासाठी लोकांना समर्थ करील. परमेश्वर रसीनच्या शत्रूंना इस्राएलविरूध्द उठवील.
12 परमेश्वर पूर्वेकडून अरामी लोकांना व पश्चिमेकडून पलिष्ट्यांना आक्रमण करायला लावील. हे शत्रू आपल्या सैन्यबळावर इस्राएलचा पराभव करतील. पण एवढे झाले तरी परमेश्वराचा इस्राएलवरचा राग शांत होणार नाही. परमेश्वर लोकांना आणखी शिक्षा करण्याच्या विचारात असेल.
13 देवाने लोकांना शिक्षा केली तरी ते पाप करायचे थांबवणार नाहीत. ते देवाला शरण येणार नाहीत. ते सर्वशक्तिमान परमेश्वराला अनुसरणार नाहीत.
14 म्हणून परमेश्वर इस्राएलचे डोके व शेपूट कापून टाकील. एका दिवसात परमेश्वर फांदी व देठ कापून टाकील.
15 (इस्राएलचे डोके म्हणजे तेथील वडीलधारी मंडळी व प्रतिष्ठित नेते आणि शेपूट म्हणजे असत्य कथन करणारे तोतये संदेष्टे.)
16 लोकांचे नेतृत्व करणारे त्यांना चुकीच्या मार्गाने नेतात आणि त्यांच्या मागून जाणाऱ्या लोकांचा नाश होतो.
17 सर्वच लोक पापी आहेत. म्हणून परमेश्वर तरूणांवर प्रसन्न नाही आणि परमेश्वर त्यांच्या विधवांवर व अनाथांवरही दया करणार नाही. ते सर्व देव सांगतो त्याच्या विरूध्द वागतात. ते खोटे बोलतात. त्यामुळे देवाचा क्रोध शमणार नाही. व देव त्यांना शिक्षा करीतच राहील.
18 कुकर्म हे ठिणगीसारखे असते. प्रथम, ते तण व काटेकुटे जाळते. नंतर रानातील झाडेझुडपे पेट घेतात आणि शेवटी त्याचा वणवा होऊन सगळेच त्याचे भक्ष्य होते.
19 सर्वशक्तिमान परमेश्वर रागावला आहे म्हणून सर्व भूमी जाळली जाईल. सर्व माणसेही त्यात जाळली जातील. कोणीही आपल्या भावाला वाचविण्याचा प्रयत्न करणार नाही.
20 माणसे उजवीकडचे काही तरी पकडून खायला बघतील, पण त्यांची भूक भागणार नाही. मग ते डावीकडचे काही तरी खातील पण त्यांची भूक तरीही भागणार नाही. मग प्रत्येक जण वळेल आणि स्वत:चेच शरीर खाईल.
21 (मनश्शे एफ्राईमशी आणि एफ्राईम मनश्शेशी लढेल व नंतर दोघेही युहदाच्या विरोधात उभे राहतील.)परमेश्वर अजूनही इस्राएलवर रागावला आहे. तो तेथील लोकांना शिक्षा करण्याच्या तयारीत आहेत.