1 आणखी एके दिवशी देवपुत्र परमेश्वराला भेटायला आले. त्यांच्याबरोबर सैतानही होता. सैतान परमेश्वराला भेटायला आला होता.
2 परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू कुठे गेला होतास?”सैतान परमेश्वराला उत्तर देत म्हणाला, “मी पृथ्वीवरच इकडे तिकडे भटकत होतो.”
3 नंतर परमेश्वर सैतानाला म्हणाला, “माझा सेवक ईयोब याच्याकडे तू लक्ष देत होतास का? सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा कोणीही नाही. तो खरोखरच फार चांगला व विश्वासू आहे. तो देवाची भक्ती करतो. तो वाईट गोष्टींपासून दूर राहातो. तू मला निष्कारण त्याच्या जवळच्या सर्व गोष्टींचा नाश करायला सांगितलेस आणि तरीही तो विश्वासू राहिला आहे.”
4 सैतानाने उत्तर दिले, “कातडीला कातडीमनुष्य जिवंत राहाण्यासाठी सर्व काही देऊ शकतो.
5 परंतु जर तू तुझ्या शक्तीचा वापर त्याला शारीरिक इजा करण्यासाठी केलास तर तो तुला तुझ्या तोंडावर शापदेईल.”
6 तेव्हा परमेश्वर सैतानाला म्हणाला, “ठीक आहे. तो आता तुझ्या हाती आहे. मात्र त्याला मारण्याची परवानगी मी तुला देत नाही.”
7 मग सैतान परमेश्वराकडून निघाला. त्याने ईयोबाला ठणकणारी गळवे दिली. ईयोबच्या सर्वांगावर तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे होती.
8 म्हणून ईयोब कचऱ्याच्या ढीगाजवळ बसला. आपली गळवे खाजविण्यासाठी त्याने खापराचा तुकडा वापरला.
9 ईयोबची बायको त्याला म्हणाली, “तू अजूनही देवाशी निष्ठावान आहेस का? तू देवाला शाप देऊन मरुन का जात नाहीस?”
10 ईयोबने बायकोला उत्तर दिले, “तू एखाद्या मूर्ख बाईसारखी बोलत आहेस. देव जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतो तेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. तसाच आपण संकटांचाही स्वीकार तक्रार न करता केला पाहिजे.” त्याच्या संकटकाळातसुध्दा ईयोबने पाप केले नाही. तो देवाच्याविरुध्द बोलला नाही.
11 ईयोबचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि शोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी ईयोब वर आलेल्या संकटांविषयी ऐकले होते. ते आपली घरे सोडून एका ठिकाणी भेटले. ईयोबला भेटून त्याला सहानुभूती दाखवावी व त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले.
12 परंतु बऱ्याच अंतरावरुन जेव्हा त्यांनी ईयोबला पाहिले तेव्हा तो ईयोबच आहे याची त्यांना खात्री वाटेना. तो खूप वेगळा दिसत होता. त्यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले आणि धूळ आपल्या डोक्यावर उडवून घेतली.
13 नंतर तिन्ही मित्र सात दिवस व सात रात्री ईयोब बरोबर बसून राहिले. ईयोबशी कुणी एक शब्दही बोलले नाही कारण ईयोब किती सहन करत आहे ते त्यांना दिसत होते.