Home |  | Audio |  | Index |  | Verses

ईयोब / Job

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42
1 अलीहू बोलणे चालू ठेवून म्हणाला:
2 “तू माझ्यासाठी आणखी थोडा धीर धर. देवाने मला आणखी बोलायला सांगितले आहे.
3 मी माझे ज्ञान सगळ्यांना वाटतो. देवाने मला निर्माण केले आणि देव न्यायी आहे हे मी सिध्द करेन.
4 ईयोब, मी खरे बोलत आहे आणि मी काय बोलतो आहे ते मला समजत आहे.
5 “देव अतिशय सामर्थ्यवान आहे, पण तो लोकांचा तिरस्कार करीत नाही. तो सामर्थ्यवान असून फार सूज्ञ आहे.
6 देव दुष्टांना जगू देणार नाही आणि तो गरीबांना नेहमीच न्यायाने वागवितो.
7 जे लोक योग्य रीतीने वागतात त्यांच्यावर देव नजर ठेवतो. तो चांगल्या लोकांना राज्य करु देतो. तो चांगल्यांना सदैव मान देतो.
8 म्हणून जर कुणाला शिक्षा झाली व त्यांना साखळदंडानी वा दोरीनी बांधून ठेवण्यात आले तर त्यांनी नक्कीच काही वाईट केले असणार.
9 आणि त्यांनी काय चूक केली ते देव त्यांना सांगेल. देव त्यांना सांगेल की त्यांनी पाप केले आहे. देव त्यांना ते गर्विष्ठ होते असे सांगेल.
10 देव त्या लोकांना त्याची ताकीद आणि सुधारणेच्या सूचना ऐकायला भाग पाडेल. तो त्यांना पाप न करण्याची आज्ञा देईल.
11 जर त्या लोकांनी देवाचे ऐकले, त्याची आज्ञा मानली, तर देव त्यांना यशस्वी करेल. आणि ते त्यांचे आयुष्य सुखाने जगतील.
12 परंतु जर त्यांनी देवाची आज्ञा पाळायचे नाकारले तर त्यांचा नाश होईल. त्यांना ज्ञान न होता मरण येईल.
13 जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना शिक्षा केली तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.
14 ते लोक पुरुष वेश्यासारखे अगदी तरुणपणी मरतील.
15 परंतु देव दु:खी लोकांना त्यांच्या दु:खातून सोडवील. देव त्या दु:खाचा उपयोग लोकांना जागवण्यासाठी आणि त्यांनी त्याचे ऐकावे यासाठी करतो.
16 “ईयोब, देवाला तुला मदत करायची इच्छा आहे. तू तुझ्या दु:खातून बाहेर पडावेस असे देवाला वाटते. तुझे आयुष्य साधे सरळ असावे अशी त्याची इच्छा आहे. तुझ्या जेवणाच्या टेबलावर अन्नाची रेलचेल असावी असे त्याला वाटते.
17 परंतु ईयोब, आता तुला अपराधी ठरवण्यात आले आहे, म्हणून तुला दुष्टांप्रमाणे शिक्षा करण्यात आली.
18 ईयोब, तू श्रीमंतीमुळे मूर्ख बनू नकोस. पैशामुळे तू आपला विचार बदलू नकोस.
19 आता तुझा पैसा तुझ्या कामी येणार नाही. आणि सामर्थ्यवान माणसे तुला मदत करणार नाहीत.
20 आता रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस. लोक रात्री पसार व्हायचा प्रयत्न करतात. आपण देवापासून लपून राहू शकू असे त्यांना वाटते.
21 ईयोब, तू खूप त्रास भोगला आहेस पण म्हणून वाईटाची निवड करु नकोस. चूक न करण्याची दक्षता घे.
22 “देवाजवळ खूप शक्ती आहे. तो जागातला सगळ्यात मोठा गुरु आहे.
23 काय करावे ते देवाला कुणी सांगू शकत नाही ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कुणी त्याला म्हणू शकत नाही.
24 “देवाने जे काही केले त्याबद्दल नेहमी त्याची स्तुती करायची आठवण ठेव. लोकांनी देवाच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.
25 देवाने काय केले ते प्रत्येकाला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांनाही देवाचे महान कार्य दिसतात.
26 होय, देव महान आहे परंतु त्याची महानता आपल्याला कळत नाही. आणि देवाचे अस्तित्व कधीपासून आहे तेही आपल्याला माहीत नाही.
27 “देव पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यात रुपांतर करतो.
28 अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.
29 देव ढगांची पखरण कशी करतो किंवा आकाशात ढगांचा गडगडाट कसा होतो ते कुणाला कळत नाही.
30 बघ, देव विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यात येतो.
31 देव त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.
32 देव आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्याला हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.
33 मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]