Home |  | Audio |  | Index |  | Verses

ईयोब / Job

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42
1 परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत. आणि त्याचे पूर्वज इतके कवडी मोलाचे होते की मी त्यांना माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते.
2 त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच कुचकामाचे आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.
3 ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
4 ते वाळवटांतील क्षार - झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
5 त्यांना दुसऱ्या माणसांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
6 त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात राहावे लागते.
7 ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहातात.
8 ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांना त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.
9 “अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
10 ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहातात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
11 देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले. ती तरुण माणसे स्वत:ला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात.
12 ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
13 मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.
14 ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
15 भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.
16 “माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दु:खानी भरलेल्या दिवसांनी मला वेढून टाकले आहे.
17 माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
18 देवाने माझ्या कोटाची कॉलर खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
19 देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.
20 देवा मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहातो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
21 देवा तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस.
22 देवा तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.
23 तू मला माझ्या मृत्यूकडे नेत आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत माणसाला मरावे हे लागतेच.
24 “परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्याला कुणी अधिक दु:ख देणार नाही.
25 देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे. गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे.
26 परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
27 मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.
28 मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
29 रानटी कुत्र्यांसारखा व वाळवंटातील शहामृगासारखा मी एकटा आहे.
30 माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.
31 माझे वाद्य दु:खी गाणे गाण्यासाठीच लावले गेले आहे. माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]