1 “ईयोब, तुला लिव्याथानाला गळ टाकून पकडता येईल का? तुला त्याची जीभ दोरीने बांधता येईल का?
2 ईयोब, तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्याला वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का?
3 ईयोब, लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का? तो तुझ्याशी मृदू शब्दात बोलेल का?
4 ईयोब, लिव्याथान तुझ्याशी करार करुन जन्मभर तुझा दास होऊन राहील का?
5 ईयोब, तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का? तू त्याला दोरीने बांधशील का? म्हणजे तुझ्या सेवक मुली त्याच्याशी खेळू शकतील?
6 ईयोब मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का? ते त्याचे तुकडे करुन ते व्यापाऱ्यांना विकण्याचा प्रयत्न करतील का?
7 ईयोब, तू लिव्याथानाच्या कातडीत किंवा डोक्यात भाला फेकशील का?
8 “ईयोब, तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस. ती कशा प्रकारची लढाई असेल याचा एकदा विचार कर.
9 तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरुन जा. तशा आशेला जागाच नाही. त्याच्याकडे नजर टाकताच तुझी भीतीने गाळण उडेल.
10 एकही माणूस त्याला जागे करुन त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. “माझ्याविरुध्द उभा राहाणाराही कुणी नाही.
11 मी (देव) कुणाचाही देणेकरी नाही. या नभोमंडळाखाली जे जे आहे ते सर्व माझे आहे.
12 “ईयोब, मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी, त्याच्या शक्तीविषयी आणि त्याच्या ऐटदार बांध्याविषयी सांगेन.
13 कुणीही त्याची कातडी छेदू शकत नाही. त्याची कातडी चिलखतासारखीआहे.
14 लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कुणीही भाग पाडू शकत नाही. त्याच्या तोंडातल्या दातांची लोकांना भीती वाटते.
15 लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या खवल्यांच्या रांगा एकमेकांना चिकटून आहेत.
16 ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की त्यातून हवासुध्दा जाऊ शकत नाही.
17 त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत. ते एकमेकांशी इतके घटृ बांधलेले आहेत की कुणी ते ओढून वेगळे करु शकत नाही.
18 लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते. त्याचे डोळे पहाटेच्या प्रकाशासारखे चमकतात.
19 त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात. आगीच्या ठिणग्या निघतात.
20 उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या गवतातून निघतो तसा धूर त्याच्या नाकातून येतो.
21 लिव्याथानाच्या श्र्वासानी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.
22 लिव्याथानाची मान मजबूत आहे. लोक त्याला घाबरतात आणि त्याच्यापासून दूर पळत सुटतात.
23 त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही. ती लोखंडासाखी कठीण आहे.
24 लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे. त्याला भीती वाटत नाही. ते पाट्यासारखे आहे. जात्याच्या खालच्या तळीसारखे ते आहे.
25 लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात. लिव्याथानाने त्यांची शेपटी हलवली की ते पळून जातात.
26 तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्याला न लागता परत येतात. त्या शस्त्रांनी त्याला काहीही इजा होत नाही.
27 तो लोखांडाची कांब गवताच्या काडीसारखी मोडू शकतो. कुजलेले लाकूड जसे पटकन मोडते तसे तो पितळ मोडतो.
28 तो बाणांना घाबरुन पळून जात नाही. वाळलेल्या गवताप्रमाणे दगड त्याच्यावर आपटून परत येतात.
29 जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्याला ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते. लोक त्याच्यावर भाले फेकतात तेव्हा तो हसतो.
30 लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे. तो चिखलात कुळक फिरवल्याप्रमाणे तास पाडतो.
31 लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो. तो त्याला उकळत्या तेलाच्या भांड्याप्रमाणे तो त्यावर बुडबुडे आणतो.
32 लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो. तो पाणी ढवळून टाकतो आणि आपल्यामागे पांढरा फेस ठेवतो.
33 पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही. तो एक भीतिविरहित प्राणी आहे.
34 लिव्याथान गर्विष्ठ प्राण्याला कमी (तुच्छ) लेखतो. तो सगळ्या रानटी श्वापदांचा राजा आहे. आणि मी, परमेश्वराने त्याला निर्माण केले आहे”