1 शहाण्या माणसाला त्याचे वडील काही सांगत असले तर तो लक्षपूर्वक ऐकतो. पण अभिमानी माणूस लोक त्याला योग्य ते सांगायला लागले तर तो ते ऐकत नाही.
2 चांगल्या माणसांना चांगले बोलल्याबद्दल फळ मिळते. पण दुष्ट माणसांना नेहमी चुकाच करायच्या असतात.
3 जो माणूस आपल्या बोलण्याबद्दल काळजी घेतो तो त्याचा जीव वाचवतो. पण जो विचार न करता बोलतो त्याचा नाश होतो.
4 आळशी माणसाला गोष्टी हव्या असतात पण त्या त्याला कधीही मिळणार नाहीत. पणे ते खूप कष्ट करतात त्यांना हव्या असलेल्या गोष्टी मिळतील.
5 चांगले लोक खोट्याचा तिरस्कार करतात. दुष्टांना लाज वाटायला लावली जाईल.
6 चांगुलपण चांगल्या, इमानी माणसाचे रक्षण करतो. पण ज्या माणसाला पाप करायला आवडते त्याचा दुष्टपणा नाश करतो.
7 काही लोक श्रीमंतीचा आव आणतात पण त्यांच्या जवळ मात्र काहीच नसते. दुसरे लोक आपण गरीब आहोत असे भासवतात पण ते खरोखरच श्रीमंत असतात.
8 श्रीमंत माणसाला जीव वाचवण्यासाठी पैसे मोजावे लागतात पण गरीबांना अशा धमक्या कधीच मिळत नाहीत.
9 चांगला माणूस हा दैदीप्यमान दिव्यासारखा असतो. पण दुष्ट माणूस चटकन् विझणाऱ्या दिव्यासारखा असतो.
10 जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा शहाणे समजतात ते संकटे ओढवून घेतात. पण जे लोक दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून घेतात ते शहाणे असतात.
11 जर एखादा माणूस पैसे मिळवण्यासाठी फसवाफसवी करील तर त्याचे पैसे लवकरच जातील. पण जो माणूस कष्ट करुन पैसे मिळवतो त्याचे पैसे वाढतात.
12 आशा नसली की ह्दय दु:खी असते. तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळाली की तुम्हाला खूप आनंद होतो.
13 जर एखाद्या माणसाने इतर लोक त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असतील तेव्हा त्यांचे ऐकले नाही तर त्याच्यावर संकटे येतील पण जो माणूस दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा मान राखतो त्याला त्याचे फळ मिळते.
14 शहाण्या माणसाची शिकवण आयुष्य देते. ते शब्द तुम्हाला मृत्यूचा फास चुकवायला मदत करतील.
15 लोकांना चांगली अक्कल असलेला माणूस आवडतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते त्याचे आयुष्य कठीण असते.
16 शहाणा माणूस कृती करण्याआधी विचार करतो. परंतु मूर्ख माणूस त्याच्या कृतीने तो मूर्ख आहे हे दर्शवितो.
17 जर दूतावर विश्वास ठेवणे शक्य नसेल तर त्याच्याभोवती संकटे येतील. पण जर माणसावर विश्वास ठेवणे शक्य झाले तर तिथे शांती नांदेल.
18 जर एखाद्याने त्याच्या चुकांपासून शिकायला नकार दिला तर तो गरीब आणि लाज वाटणारा होईल. पण जर एखाद्याने त्याच्या वरील टीकेकडे लक्ष दिले तर त्याला त्याचा फायदा होईल.
19 जर एखाद्या माणसाला काही हवे असले आणि नंतर ते त्याला मिळाले तर त्याला खूप आनंद होईल. पण मूर्खांना फक्त दुष्टावा हवा असतो. ते बदलायला तयार नसतात.
20 शहाण्या लोकांशी मैत्री करा म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल. पण जर तुम्ही मूर्खांशी मैत्री केली तर तुम्ही संकटात सापडाल.
21 पापी जिथे जातील तिथे संकटे त्यांचा पाठलाग करतात. पण चांगल्या माणसांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात.
22 चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल.
23 गरीब माणसाकडे खूप धान्य पिकवणारी चांगली जमीन असू शकते. पण तो वाईट निर्णय घेतो आणि उपाशी राहातो.
24 जर एखाद्याचे आपल्या मुलांवर खरोखच प्रेम असेल तर तो त्यांचे चुकल्यावर त्यांना काठीने मारायलाही कमी करणार नाही. ते चुकीने वागल्यावर तो त्यांना शिस्त लावेल. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला योग्य वेळी काळजीपूर्वक शिकवाल.
25 चांगल्या लोकांना समाधान होईपर्यंत खायला मिळेल. चांगल्या लोकांना त्यांना हव्या असलेल्या गोष्टी खरोखरच मिळतील. पण दुष्ट लोकांचे पोट रिकामेच राहील. दुष्ट लोकांना महत्वाच्या गोष्टींशिवाय राहावे लागेल.