Home |  | Audio |  | Index |  | Verses

नीतिसूत्रे / Proverbs

अध्याय : 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31
1 मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव.
2 मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील.
3 प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर.
4 म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल.
5 परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.
6 तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील.
7 तुझ्या स्वत:च्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस. पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा.
8 तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील.
9 तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वांत चांगल्या गोष्टी त्याला दे.
10 नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.
11 मुला, परमेश्वर तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल. पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस. त्यापासून शिकायचा प्रयत्न कर.
12 का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे.
13 ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात.
14 ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुप्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
15 ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यावान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही.
16 ज्ञान तुम्हाला मोठे आयुष्य संपत्ती आणि मानसन्मान देते.
17 ज्ञान असलेले लोक शांतीत आणि समाधानात जगतात.
18 ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात.
19 परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले.
20 परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले.
21 मुला, तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव. या गोष्टी सोडू नकोस.
22 ज्ञान आणि समज तुला जीवन देतील. आणि ते अधिक सुंदर करतील.
23 नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस.
24 तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल.
25 अचानक येणाऱ्या संकटास घाबरु नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईन. आणि वाईट लोक तुला काय करतील ह्याला घाबरु नको. परमेश्वर तुझे रक्षण करील व तुझा जीव वाचवील.
26
27 जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा.
28 जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.”
29 तुमचा शेजारी विश्वासाने तुमच्याजवळ राहातो तेव्हा शेजाऱ्याला त्रास देण्याच्या योजना आखू नका. तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेसाठी एकमेकांच्या जवळ राहता.
30 योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका.
31 काही लोकांना चटकन् राग येतो. आणि ते लगेच वाईट गोष्ट करतात. तुम्ही तसे करु नका.
32 का? कारण परमेश्वर वाईट लोकांचा तिरस्कार करतो. परंतु परमेश्वर चांगल्या लोकांचा पाठीराखा असतो.
33 परमेश्वर वाईट लोकांच्या कुटुंबाविरुध्द असतो. परंतु जे लोक योग्य रीतीने जगतात त्यांच्या कुटुंबांना तो आशीर्वाद देतो.
34 जर एखादा माणूस गर्विष्ठ असला आणि दुसऱ्यांची चेष्टा करत असला तर परमेश्वर त्याला शिक्षा करील आणि त्याची चेष्टा करील. पण परमेश्वर नम्र लोकांशी दयाळू असतो.
35 शहाणे लोक सन्मान प्राप्त होईल असे जीवन जगतात परंतु मूर्ख लोक लाज वाटण्यासारखे जीवन जगतात.

Top |  | अगला-  |  | Index |  | Home
Full online version here [with search engine, multilingual display and audio Bible]