1 मुबलक अन्नाने भरलेल्या भांडणयुक्त घरापेक्षा कोरड्या भाकरीच्या तुकडा शांतीने खाणे बरे!
2 सेवकाचा हुशार मुलगा मालकाच्या आळशी मुलावर ताबा मिळवील. तो हुशार मुलगा मालकाचे सर्व काही घेईल.
3 सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी आगीत टाकतात. लोकांची मने मात्र परमेश्वर शुध्द करतो.
4 दुष्ट माणूस इतर लोक वाईट गोष्टी सांगतात त्या ऐकतो. जे लोक खोटे बोलतात ते खोटे ऐकतात सुध्दा.
5 काही लोक गरीबांची थट्टी करतात. ज्यांच्यापुढे समस्या असतात त्यांना ते हसतात. या वरुन असे दिसते की ते वाईट लोक, ज्या देवाने त्यांची निर्मिती केली त्या देवाचा आदर करीत नाहीत. त्यांना शिक्षा होईल.
6 नातवंडे म्हाताऱ्या माणसांना आनंदी बनवतात. आणि मुलांना त्यांच्या आईवडिलांचा अभिमान असतो.
7 मूर्खाने खूप बोलणे शहाणपणाचे नसते. तसेच राज्यकर्त्याने खोटे बोलणे शहाणपणाचे नसते.
8 काही लोकांना कुठेही गेले तरी लाच म्हणजे दैवी मंत्र वाटते आणि ती कामही करते असे वाटते.
9 एखाद्याने तुमचे काही वाईट केल्यानंतर जर तुम्ही त्याला क्षमा करु शकला तर तुम्ही मित्र बनू शकता. पण जर तुम्ही त्याची करणी सतत मनात ठेवली तर त्यामुळे मैत्रीत बाधा येईल.
10 हुशार माणूस तंबी दिल्या बरोबर शिकतो. परंतु मूर्ख माणूस शंभर फटके मारल्यावरही शिकत नाही.
11 वाईट माणसाला केवळ चुकाच करायच्या असतात. शेवटी देव त्याला शिक्षा करायला देवदूत पाठवेल.
12 मूर्खाला भेटण्यापेक्षा, जीची पिल्ले चोरीला गेलीत अशा चवताळलेल्या अस्वलाच्या मादीला तोंड देणे बरे!
13 जे लोक तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी तुम्ही वाईट गोष्टी करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तुम्हाला आयुष्यभर संकटांना सामोर जावे लागेल.
14 वादाला तोंड फोडणे हे धरणात भोक करण्यासारखे आहे. वाद मोठा होण्याच्या आतच तो बंद करा.
15 दोषी नसणाऱ्याला शिक्षा करणे आणि दोषी असणाऱ्यांचे समर्थन करणे या दोन गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत.
16 मूर्खाकडचा पैसा वाया जातो. का? कराण तो मूर्ख पैशाचा वापर शहाणा होण्यासाठी करत नाही.
17 मित्र नेहमी प्रेम करतो. खरा भाऊ संकटाच्या वेळीसुध्दा मदत करतो.
18 केवळ मूर्खच दुसऱ्या माणसाच्या कर्जाची हमी देईल.
19 ज्या माणसाला वाद घालायला आवडतो त्याला पाप करायलाही आवडते. जर तुम्ही स्वत:चीच भलावण केली तर तुम्ही संकटांना आमंत्रण देता.
20 वाईट माणसाला नफा होणार नाही. जो माणूस खोटे बोलतो त्याच्यावर संकटे येतील.
21 मूर्ख मुलगा असलेले वडील दु:खी होतील. मूर्खाचे वडील सुखी नसतील.
22 आनंद चांगल्या औषधासारखा असतो. पण दु:ख हे आजारासारखे असते.
23 वाईट माणूस दुसऱ्यांना फसवण्यासाठी गुप्ततेने पैसे घेतो.
24 शहाणा माणूस नेहमी सर्वांत चांगली गोष्ट करण्याचा विचार करतो. पण मूर्ख माणूस दूरच्या जगाचे स्वप्न पाहातो.
25 मूर्ख मुलगा वडिलांसाठी दु:ख आणतो आणि जिने त्याला जन्म दिला त्या आईसाठी वेदना आणतो.
26 काहीही चूक केली नसताना एखाद्याला शिक्षा करणे चूक आहे. जे नेते प्रामाणिक असतात त्यांना शिक्षा करणे चूक आहे.
27 शहाणा माणूस शब्द काळजीपूर्वक वापरतो. शहाणा माणूस लवकर रागावत नाही.
28 मूर्ख माणूस जर गप्प बसला तर तो सुध्दा शहाणा वाटतो. जर तो काही बोलला नाही तर तो शहाणा आहे असे लोकांना वाटते.