1 ही याकोहचा मुलगा अगूर याची नीतिसूत्रे आहेत. हा त्याचा इथिएल आणि युकालयांना निरोप आहे.
2 मी पृथ्वीवरचा सगळ्यात वाईट माणूस आहे, मी जितके समजून घ्यायला हवे होते तितके मी समजू शकत नाही.
3 मी शहाणा व्हायला शिकलो नाही, आणि मला देवाबद्दल काहीही माहीत नाही.
4 स्वार्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल.?
5 देवाने म्हटलेला प्रत्येक शब्द परिपूर्ण असतो. जे लोक देवाकडे जातात त्यांच्यासाठी देव म्हणजे एक सुरक्षित जागा असते.
6 म्हणून देव ज्या गोष्टी सांगतो त्या बदलण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तो तुम्हाला शिक्षा करेल आणि तुम्ही खोटे बोलता हे सिध्द करेल.
7 देवा मी मरण्यासाठी तुला दोन गोष्टी करायला सांगणार आहे.
8 खोटे न बोलण्यासाठी मला मदत कर आणि मला खूप श्रीमंत वा खूप गरीब करु नकोस. मला रोज लागणाऱ्या गोष्टीच फक्त दे.
9 माझ्याकडे जर गरजेपेक्षा जास्त असेल तर तुझी मला गरज नाही असे मला वाटायला लागेल. पण मी जर गरीब असलो तर मी कदाचित् चोरी करेन. त्यामुळे मी देवाच्या नावाला लाज आणेन.
10 सेवकाजवळ त्याच्या धन्याबद्दल कधीही वाईट गोष्टी सांगू नका. जर तुम्ही सांगितल्या तर धनी तुमच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हीच अपराधी आहात असे त्याला वाटेल.
11 काही लोक त्यांच्या वडिलांविरुध्द बोलतात आणि ते त्यांच्या आईबद्दल आदर दाखवीत नाहीत.
12 काही लोकांना आपण चांगले आहोत असे वाटत असते पण ते खरोखरच वाईट असतात.
13 काही लोक स्वत:ला फार चांगले समजतात. आपण दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले आहोत असे त्यांना वाटते.
14 असे काही लोक असतात ज्यांचे दात तलवारीसारखे असतात त्यांचे जबडे सुरी सारखे असतात. ते गरीबांकडून सर्व काही हिसकावण्यात त्यांचा वेळ खर्ची घालतात.
15 काही लोकांना जे जे घेणे शक्य असते ते ते घ्यायाला आवडते. ते फक्त ‘मला दे,’ ‘मला दे’ एवढेच म्हणत असतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, खरे म्हणजे चार, ज्याना कधीही पुरेसे मिळत नाही.
16 मृत्यूची जागा, वांझ स्त्री, पाऊस हवा असलेली कोरडी जमीन आणि रुद्र भीषण, न विझवता येणारी आग.
17 जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल.
18 तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.
19 आकाशात उडणारा गरुड, दगडावर चालणारा साप, समुद्रात जाणारे जहाज आणि स्त्रीच्या प्रेमात पडलेला पुरुष
20 जी स्त्री नवऱ्याशी एकनिष्ठ नसते ती तिने काहीही चूक केलेली नाही असे वागते. ती खाते, आंघोळ करते आणि तिने काहीही चूक केली नाही असे म्हणते.
21 तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही.
22 राजा होणारा सेवक, मूर्ख माणूस ज्याच्याकडे त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत.
23 प्रेम न मिळालेली तरीही नवरा मिळवणारी स्त्री आणि मालकिणीवर सत्ता गाजवणारी नोकर असलेली मुलगी
24 पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.
25 मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात पण तरी ही त्या उन्हाळाभर अन्न साठवतात.
26 ससा अगदी लहान प्राणी आहे. पण ते खडकात आपले घर करतात.
27 टोळांना राजा नसतो पण तरीही ते एकत्र काम करु शकतात.
28 पाली हाताने पकडण्याइतक्या लहान असतात. पण तुम्ही त्यांना राजाच्या घरातदेखील पाहू शकता.
29 तीन गोष्टी चालताना फार महत्वाच्या वाटतात, खरे म्हणजे चार.
30 सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे. त्याला कशाचीही भीती वाटत नाही.
31 गर्वाने चालणारा कोंबडा, बकरी आणि त्याच्या लोकांमध्ये असलेला राजा.
32 जर तुम्ही मूर्ख असाल आणि इतरांपेक्षा आपण चांगले आहोत असे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही वाईट गोष्टींच्या योजना आखत असाल तर तुम्ही ते थांबवा आणि तुम्ही काय करीत आहात याचा विचार करा.
33 जर एखादा माणूस दूध घुसळत असेल तर तो लोणी काढतो. जर एखाद्याने कुणाला नाकावर ठोसा मारला, तर त्यातून रक्त येईल. त्याचप्रमाणे, जर तुम्ही लोकांना राग येण्यासारखे काही केले तर तुम्ही संकटे निर्माण कराल.